महाराष्ट्रातील कोल्हापूर, कऱ्हाड, रत्नागिरी, वाई इ. शहरांशी-गावांशी, तसेच बेळगाव, गोवा, इंदूर इ. महाराष्ट्रेतर ठिकाणांशी आचार्य अत्रे यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आला. त्यातून राजकीय, ऐतिहासिक, साहित्यिक संचित घडत गेले. त्या संचिताचं आणि अत्रे यांच्या व्यक्तिमत्त्वाचं समग्र दर्शन घडविणारं पुस्तक आहे ‘आचार्य अत्रे : बारा गावचं पाणी.’ १९४६मध्ये बेळगावात झालेल्या साहित्य संमेलनात आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मांडलेला ठराव, गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी झिजवलेली लेखणी, गोव्यातील काही ठिकाणी घेतलेल्या सभा, कोल्हापूरशी आणि वि. स. खांडेकरांशी असलेलं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं, बाबा कदम आणि शिवाजी सावंतांना त्यांनी दिलेलं प्रोत्साहन, रत्नागिरीच्या साहित्य संमेलनापासून सुरू झालेला अत्रे-फडके वाद इ. अनेक महत्त्वपूर्ण घटनांनी, व्यक्तींनी गजबजलेलं हे पुस्तक आहे.