केवळ अर्थार्जन हा हेतू न ठेवता, मुंबईसारख्या महानगरीत शिक्षण घेतलेले डॉ. संजय कुलकर्णी उदगीरसारख्या ग्रामीण भागात जाणीवपूर्वक गेली तेवीस वर्षे प्रॅक्टिस करत आहेत. ग्रामीण भागात दवाखाना, हॉस्पिटल चालवणे एक आव्हान असते. वैद्यकीय अभ्यासक्रमात नसलेल्या अनेक गोष्टींना इथे सामोरे जावे लागते. रोज अनुभवाचे नवे पदर सापडत जातात. कधी निरुत्साही करणारेही अनुभव असतात. हे लेखन म्हणजे आरोग्याविषयीचे मार्गदर्शन नाही. किस्से, गंमत, विनोद, विसंगती, फजिती, फरफट यांपलीकडे जाऊन अतिशय सहृदयतेने, तटस्थपणे असे ललितरम्य लेखन करता येते, याचा वस्तुपाठच आहे. सहज सांगता सांगता, ते मानवी स्वभावाचे अनेक पैलू आपणास दाखवतात. ही सहजता फार दुर्मीळ असते. ह्या पुस्तकातून आपणास तो आनंद मिळेल.