दाते-कर्वे यांच्या महाराष्ट्र शब्दकोश मंडळ लिमिटेड या सस्थेने १९३८ मध्ये महाराष्ट्र शब्दकोशाचे कार्य पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोशाचे कार्य हाती घेतले. तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. सर्वच प्रकारच्या अडचणी होत्या. अशा परिस्थितीत त्यावेळी महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश छापून पूर्ण झाला हेच विशेष म्हटले पाहिजे.
'वरदा बुक्स'ने मार्च १९८८ मध्ये महाराष्ट्र शब्दकोशाच्या आठ खंडांचे पुनर्मुद्रण केले. या उपक्रमाचे महाराष्ट्रात चांगलेच स्वागत झाले. म्हणून शब्दकोशाचाच पूरक भाग म्हणून असलेले 'महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश' विभाग १ व २ यांचेही पुनर्मुद्रण करण्याचा संकल्प 'वरदा बुक्स'ने केला व तो संकल्प आता सिद्धीस जात आहे.
कोणत्याही भाषेत म्हणी व वाक्संप्रदाय यांचे महत्त्व आली. फार असते. भाषा समृद्ध करण्यास व प्रौढ करण्यास त्यांची मदत होत असते. पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत संपादक लिहितात 'वाक्संप्रदायाचा एवढा मोठा स्वतंत्र कोश कोणत्याही भारतीय भाषेत तर नाहीच पण एखाद्या पाश्चात्य भाषेत तरी आहे काय ? याविषयी शंकाच आहे. तेव्हा मंडळाच्या व संपादकांच्या आजपर्यंतच्या लौकिकाप्रमाणेच हाही संदर्भ ग्रंथ मोठ्या परिश्रमाने व अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत तयार केला आहे. हे सहजी कळून येणार आहे.'