आयुष्यात प्रत्येकाची काही ना काहीतरी स्वप्नं असतात, इच्छा-आकांक्षा असतात. कोणाला घर विकत घ्यायचं असतं, कोणाला चारचाकी हवी असते; तर कोणाला उच्च शिक्षण घ्यायचं असतं. आणि ही स्वप्नं-आकांक्षा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आर्थिक नियोजन!गुंतवणूक क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या प्रा. वीरेंद्र ताटके यांनी या पुस्तकाच्या सुरुवातीला आर्थिक नियोजनाचा मूलभूत मंत्र दिला आहे…एकूण उत्पन्न – गुंतवणूक = खर्चअशा प्रकारे ताटके माहिती देता देता आपल्याला आर्थिकदृष्ट्या ‘साक्षर’ करतात, आर्थिक नियोजनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन देतात.बँकामधली विविध प्रकारांतली गुंतवणूक, पोस्टातली गुंतवणूक, म्युच्युअल फंड, शेअर बाजार, रिअल इस्टेट, सोनं इ. गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांचे फायदे-तोटे उदाहरणांसह ताटके सांगतात. तसंच आयुष्यातले टप्पे कोणते आणि कुठली गुंतवणूक कधी करावी याविषयी मार्गदर्शन करतात.
मुलांचं शिक्षण, आजारपण, घराची खरेदी, स्वत:ची हौस-मौज यांसारख्या कुंटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन कष्टाने कमावलेला आपला पैसा गुंतवण्याचे फायदेशीर मार्ग हे पुस्तक दाखवतं. म्हणूनच हे आहे… माझं कुटुंब, माझी गुंतवणूक !