प्रस्तुत पुस्तकात वेगवेगळ्या धर्मातील, वेगवेगळ्या काळातील महान विचारांचे समुद्रमंथन करून त्यातील काही बहुमोल विचार दिले आहेत.
या वचनामृतात भगवान बुद्धांची अमरवाणी आहे, तर आत्मा व उपासना म्हणजे काय? त्यांचे खरे स्वरूप कसे असते याविषयी भगवान शंकराचार्यांची बहुमूल्य मते आहेत. धर्म, तप, ज्ञान व संयम याविषयी भगवान महावीरांचे विचार आहेत. सच्छील जीवन कसे जगावे, गुरुसेवेचे महत्त्व काय, शब्दांचे सामर्थ्य काय आहे, परमेश्वराची उदारता व दया याचे स्वरूप काय आहे याचे विवेचन गुरुनानक करतात.
हे सुविचार केवळ आध्यात्मिकतेच्या वाटेवर नेणारे किंवा आधिभौतिक तत्त्वज्ञान सांगत नाहीत, तर लौकिक जीवन कसे जगावे याचेही मार्गदर्शन या पुस्तकात आढळून येते. सच्छील, निर्भय आणि सत्मार्गी जीवन जगायचे असेल तर हे महान विचार तुम्हाला सहायक ठरतील. उच्च-नीचतेपासून दूर ठेवील, धर्मनिरपेक्ष जीवन जगण्याकडे तुम्हाला घेऊन जातील एवढी या विचारांत शक्ती आहे.
संस्कारशील वाढत्या वयाच्या मुलांसाठी हे जितके उपयुक्त ठरतील, तितकेच त्या कोणत्याही वयाच्या सुजाण, जागृत व्यक्तीला त्याचे जीवन अधिक सुखी, यशस्वी, धर्मपरायण व समाधानी बनवण्यासाठी मदत करतील. सामर्थ्याचा अमाप खजिना आपल्या अंतस्थ आहे; पण तो सुप्तावस्थेत आहे. त्याला जागे कसे करावे आणि आपल्या उन्नतीसोबत आपल्या बांधवाची, समाजाची प्रगती कशी साधता येईल, याचे मोलाचे मार्गदर्शन हे पुस्तक करते.