बालपणीच आईवडिलांनी टाकलेली समीम अनाथालयात सात वर्षांची होई पर्यंत राहिली. अचानक एके दिवशी तिच्या कुटुंबियांनी तिला परत नेण्याचे ठरविले; तेव्हा तिला कधी एकदा स्वत:च्या घरात जाईन असं झालं. ती आली मात्र एका अत्यंत घाणेरड्या घरात; जिथं तिला तिच्या लहान वयाला न झेपणारी कामे सतत करावी लागत. तिच्या जन्मदात्रीनेच तिचा अनन्वीत छळ आरंभला. या सर्वाला आपण स्वत:च जबाबदार आहोत असे लहानगी समीम समजू लागली. स्वत:च स्वत:ला शारीरिक इजा करून घेऊ लागली. आईबरोबर पाकिस्तानात जायला मिळणार हे समजल्यावर तिचा आनंद गगनात मावेना. तेथे पोहोचल्यावर मात्र तिला कळून चुकले की तिच्या आईने तिला सुट्टीवर नेलं नव्हते. तेरा वर्षाच्या समीमचे एका अनोळखी पुरुषाबरोबर बळजबरीने लग्न लावण्यात आले. दिवस गेल्यावर तिला परत ग्लासगोत आणण्यात आले; ते केवळ कुटुंबाकडून होणारा छळ सोसण्यासाठी. खरं प्रेम म्हणजे काय याची जाणिव झाल्यावर स्वत:च्या लहान मुलाला घेऊन तिने घरच्या हिंसाचारापासून स्वत:ची सुटका करून घेतली. स्वत:च्या घरचा भयानक अनुभव ती मागे ठेऊन आली असा तिला विश्वास होता. परंतु तिच्या पळून जाण्याने तिच्या कुटुंबाच्या झालेल्या बेइज्जतीच्या परिणामांना तिला तोंड द्यावे लागेल याची कल्पना तिला कशी असणार? बिलाँगिंग म्हणजे एक धक्कादायक सत्य घटना आहे. ही कथा आहे एका छोट्या मुलीची, स्वत:च्या भूतकाळापासून करून घेतलेल्या सुटकेची, मोठी होत असतांना स्वत:च्या कुटुंबाकडूनच होणा-या छळा विरूद्ध दिलेल्या लढ्याची. सध्या नवरा आणि स्वत:च्या दोन मुलांबरोबर समीम अली मँचेस्टरला राहते. स्थानिक राजकारणात तिचा सक्रीय सहभाग आहे. मॉस साईड या संस्थेत ती समुपदेशनाचे काम करते. बळजबरीने लावल्या गेलेल्या लग्नांविरूद्ध ती सतत आवाज उठवत आहे.