अविचल...तंत्रविद्या कोळून प्यायलेला एक श्रीमंत तरुण...वामपंथीयांच्या तावडीत सापडलेल्यांची सुटका करण्याचं काम निरपेक्षपणे करणारा... श्रीनिवास...एका खेडेगावातील पुजाऱ्याचा तरुण मुलगा...प्रिया नावाच्या तरुण मुलीच्या माध्यमातून हंबीर नावाचा वामपंथी त्याच्यावर जाळं टाकतो...श्रीनिवास त्या जाळ्यात पुरेपूर अडकतो... अविचल त्याची त्या जाळ्यातून सुटका करतो...बाहेरची बाधा झालेल्या तनयाची बाधा उतरवायला एका गूढ वाड्यात अविचल जातो आणि तनयाच्या आजीच्या जाळ्यात सापडतो...अविचलचा मित्र भैरव आणि दत्तभक्त पाठक त्या जाळ्यातून अविचलला सोडवतात आणि अविचल तनयाच्या आजीला धडा शिकवतो...वांचूमाळ या आदिवासी माणसाबरोबर अविचल आणि त्याच्यासारखे काही तांत्रिक वांचूमाळच्या गावी पोचतात आणि मृत्यूच्या सापळ्यात अडकतात...थरारक घटनांची रेलचेल असलेल्या उत्कंठावर्धक लघुकादंबऱ्या ‘‘वेताळाय नम:। तीव्राय नम:। तमनायकाय नम:।’’ असं म्हणत त्यांनी मद्याने भरलेल्या उलट्या वलयाच्या शंखातून धार ओतून विचमन केलं आणि जारण मंत्राच्या पठणाला त्यांनी सुरुवात केली. जारण मंत्राच्या जबर तडाख्याखाली अविचलचं मन होलपटलं. खोल भोवऱ्यात सापडल्याप्रमाणे अविचलचं मन चोळामोळा होण्यापूर्वी त्याच्या मनात लख्ख प्रकाश पडला. तनयाचं झपाटणं म्हणजे फक्त आमिष होतं! खरं सावज तर तोच होता. त्याचं मन पूर्ण असंरक्षित आणि बेसावध असताना त्याच्यावर जारण जागवता यावं म्हणून हा सर्व खेळ काळजीपूर्वक आखला गेला होता. तनयाचं संरक्षण करताना जेव्हा त्याच्या शक्ती पूर्णपणे एका दिशेने एकवटल्या गेल्या होत्या, त्या वेळी त्याच्यावर हल्ला करण्याचा हा कावा भ्याडपणाचा होता यात शंकाच नव्हती! पण वाममार्गात योग्य काय आणि अयोग्य तरी काय?