"बॅरिंग्टन हे लंडनमधील एक सधन आणि नामवंत घराणं. ह्यूगो बॅरिंग्टन हा त्या घराण्याचा वंशज. गाइल्स आणि एमा ही त्याची दोन अपत्यं. हॅरी क्लिप्टन हा ह्यूगोचा अनौरस मुलगा. ह्यूगोची झालेली हत्या, हॅरी क्लिप्टन आणि एमा बॅरिंग्टन यांच्या लग्नाला चर्चने केलेली मनाई, ह्यूगोच्या हत्येनंतर बॅरिंग्टन घराण्याच्या वारसाबाबत न्यायालयात उभा राहिलेला वाद, या प्रकरणात गाइल्सच्या बाजूने लागलेला निकाल, त्यानंतर हॅरी व एमाचा झालेला विवाह, त्यानंतर त्यांच्या मुलाचा सॅबेस्टियनचा जन्म, ह्यूगोच्या एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेली मुलगी जेसिका हिला एमा आणि हॅरीने दत्तक घेणे, यथावकाश सॅबेस्टियनचा तारुण्यात प्रवेश, गाइल्सचा निवडणुकीत विजय, एमा आणि गाइल्सच्या आईचा एलिझाबेथचा मृत्यू, मृत्यूसमयी तिने हॅरीच्या हातात दिलेला लिफाफा, खट्याळ पण अतिशय हुशार असणारा सेबॅस्टियन एका डॉनच्या जाळ्यात सापडणं, डॉनचा सज्जन मुलगा ब्रूनोशी सेबॅस्टियनची चांगली मैत्री होणं, सेबॅस्टियनकडून आपल्या बनावट नोटा रोदिनने बनवलेल्या एका पुतळ्यातून इंग्लंडमध्ये आणण्याचा बेत डॉनने रचणं, सेबॅस्टियनला याची कल्पनाच नसणं, या बेताचा सुगावा पोलिसांसहित हॅरी, एमा आणि गाइल्सलाही लागणं, त्याच वेळी सेबॅस्टियनाला केंब्रिज विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाल्याची बातमीही सर्वांना समजणं अशा नाट्यपूर्ण घटनांसाठी आणि डॉन या बनावट नोटा इंग्लंडमध्ये आणण्यात यशस्वी होतो का, डॉनच्या तावडीतून सुटून सेबॅस्टियन आपल्या आई-वडिलांचे केंब्रिज विद्यापीठात त्याने शिक्षण घ्यावे हे स्वप्न पूर्ण करू शकेल का, हे जाणून घेण्यासाठी ‘बेस्ट केप्ट सिक्रेट’ हे पुस्तक वाचलं पाहिजे. "