‘चिअर्स’ फक्त पेल्याला पेला भिडल्यावर होत नाही. वपुंचं ‘चिअर्स’ हृदयाला भिडलेलं हृदय आणि त्यातून उमलणारी आनंदधून अधोरेखित करतं. ज्यांच्या सहवासात आयुष्य बहरुन जावं, अशी वपुंच्या आयुष्यातील विलक्षण माणसं या पुस्तकात भेटतात. एखादे अण्णा वपुंना सांगतात, ‘जुनं काहीही सोडायचं नाही, जुनं सगळं करता करताच नवं सापडेल.. वयाच्या तिसऱ्या वर्षी आपण श्री गिरवतो. ती श्री इतिश्री होईतो राहतेच.’ तर भाऊसाहेबांसारखा उमदा माणूस आत्मविश्वासाचं खोल बीज रुजवतो. असे अनेक पेले इथे भेटतात. रिते होत नाहीत तर रसिकांच्या मनोवृत्तीला चिअर्स करतात. आयुष्य असंही जगता येतं हे सांगून जातात. व्यक्तिपरिचय हा मनाला उभारी देणारा असावा, उत्तेजन देणारा असावा आणि त्यासाठी अशा व्यक्तींचा सहवास मिळावा. वपुंना सहवास मिळाला आणि म्हणून ते त्या व्यक्तींना वाचू शकले. चिअर्स म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवू शकले. नशा आहे पण धुंदी नाही. मद्य आहे पण ग्लानी नाही. पेले आहेत पण रितेपण नाही. रंग आहेत जे बेरंगी करत नाहीत. चिअर्स !