‘वपु’ ही आद्याक्षरं मराठी माणसाच्या मनाच्या खूप जवळ आहेत... त्यांच्या कथांनी वाचकांच्या मनावर गारूड केलं... त्यांच्या काही कथांभोवती, वेगवेगळ्या लेखकांनी एकांकिकेच्या आविष्काराचा ‘गोफ’ विणला... या गोफातून घडतं जीवनाचं व्यामिश्र दर्शन... कधी एखादी लोकलमध्ये भेटलेली तरुणी स्वप्नवत् वाटते... तर कधी एका लहान मुलीचा करुण अंत होतो... कधी एखादा फेरीवाला मुलासारखा जीव लावतो... तर कधी नवरा-बायकोचं अर्थहीन नातं अस्वस्थ करून जातं... भांडणाच्या क्लासची कल्पनाही समोर येते एखाद्या एकांकिकेतून... तर भावाभावांच्या नात्यातील गैरसमज मानवी मनाचं वास्तव चित्र रेखाटून जातो... एखाद्या सोनटक्केवर नियती घाव घालते... किती ही गुंतागुंत भावनांची आणि त्यामुळे होणारी घुसमट माणसाच्या मनाची... ‘वपुं’च्या कथांचं हेच वैशिष्ट्य अधोरेखित करणारे हे एकांकिकांचे ‘नवरंग’... प्रभावी संवाद आणि भावनांचे पडसाद हे या ‘नवरंगां’चं सामर्थ्य... कथा ते एकांकिका असा हा प्रवास वाचकांना नक्कीच लुभावणारा... ‘फॉर्म’ आणि आशय यांचं नातं उलगडून दाखवणारा... वाचा आणि अंतर्मुख व्हा...