‘मानवी जीवन हा एक प्रकारचा त्रिवेणी संगम आहे. स्वत:चे सुख आणि विकास ही या संगमातील पहिली नदी. कुटुंबाचे ऋण फेडणे हा त्यातला दुसरा प्रवाह आणि ज्या समाजाचा घटक म्हणून समाजाच्या प्रगतीला हातभार लावणे ही या संगमातील गुप्त सरस्वती.’ व्यक्तिगत ऋण, कुटुंबऋण आणि समाजऋण ही तीनही सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अविरोधाने नांदू शकली तरच हे जीवन यशस्वी झाले असे म्हणता येईल. मानवी जीवनाचे रहस्य सांगणारे हे क्रांतिकारी विचार वि. स. खांडेकरांनी ‘सुखाचा शोध’ या कादंबरीतून मांडले आहेत. ‘त्यागातच सुख असते’ ही परंपरागत जीवनमूल्ये प्रमाण मानणारा ‘आनंद’, एकावरच संसाराचे ओझे लादणारी ‘आप्पा आणि भय्या’ ही कर्तृत्वहीन माणसे, मनामनाची मिळवणी करण्यात असमर्थ ठरलेली सुशिक्षित ‘माणिक’ आणि भावनातिरेक व भावनाशून्यता या दोन्ही विकृतींपासून अलिप्त असलेली ‘उषा’. ही सर्व पात्रे हेच सांगतात की, `परंपरागत आदर्श आंधळेपणाने पाळणे हे व्यक्तीच्या तसेच समाजाच्या दृष्टीनेही अहितकारक ठरते.` `मानवी मूल्यांच्या दृष्टीने भोगापेक्षा त्याग श्रेष्ठ आहे; परंतु त्याग कधीही कुपात्री होता कामा नये.` १९३९ साली मांडलेले हे विचार आजच्या समाजालाही उपयुक्त ठरावे.