आपल्या व्यवसायात कार्यमग्न असतानाही सामाजिक भान ठेवून टिपलेल्या अनुभवांचे हे लेखन. भारताच्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासभागांमध्ये सुधा मूर्ती यांनी भटकंती केली आहे. त्या पायी फिरल्या आहेत, त्यांनी बसनंही प्रवास केला आहे. या भागात अठराविश्वे दारिद्र्यात राहणाऱ्या माणसांच्या दारात आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सुविधा नेऊन पोचवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्यामुळेच समाजाच्या विविध स्तरांतील असामान्य व्यक्तींच्या सहवासात त्या आल्या. मग ते मुंबईतून उठून जाऊन भूकंपग्रस्त गुजरातमध्ये स्थायिक होणारं भिकाऱ्यांचं कुटुंब असो, हुंड्यासाठी बळी गेलेल्या एका तरुणीची माता असो... नाही तर मोठ्या रकमेचा चेक देणगी म्हणून पाठवणारा अनामिक दाता असो... या सर्वांमुळे, त्यांच्या हृदयाला स्पर्श करून जाणाऱ्या कहाण्यांमुळे आणि त्यांच्या मुलखावेगळ्या जीवनविषयक तत्त्वज्ञानामुळे सुधा मूर्तींचं जीवन समृद्ध होऊन गेलं आहे.एक प्राध्यापिका आणि एक समाजसेविका या दोन्ही नात्यांनी त्यांना जे काही विलक्षण अनुभव आले ते त्यांनी आपल्यापुढे मांडले आहेत. विनोदाची झालर असलेल्या त्यांच्या घरगुती, मनमोकळ्या लेखनशैलीतून निर्माण झालेलं हे पुस्तक सुधा मूर्ती यांचं कार्य आणि त्यांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान यांचं व्यापक दर्शन घडवणारं आहे.