बंगल्याच्या अंगणात किंवा दारासमोरच्या लहानशा जागेत छोटीशी बाग असेल तर छान वाटतं. इतकंच काय, तर अगदी फ्लॅटमधल्या गॅलरीत, खिडक्यांच्या ग्रिल्समध्ये किंवा घराच्या एखाद्या कोप-यात, जागेनुसार एखादं रोप किंवा फुलझाडं लावल्यास घराची शोभा तर वाढतेच व प्रफुल्लितही वाटतं. पण मग प्रश्न पडतो की, जागेनुसार बाग तयार करायची कशी? त्यासाठी काय तयारी करायची? आणि एकदा का बाग तयार झाली की, ती नीट कशी ठेवायची, तिची काळजी कशी घ्यायची? वरील सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतील. यात बागांचे विविध प्रकार, जागेनुसार झाडांची निवड कशी करावी, बोन्साय कसे करावे, खतं-कीटकनाशकं कशी वापरावीत, पुष्परचनेचे विविध प्रकार कोणते इत्यादी विषयांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी, तसेच जिज्ञासूंसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.