भाज्या हा तर रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग. त्यामुळे पानात एक भाजी तरी हवीच! मात्र प्रत्येक गृहिणीला हमखास सतावणारा प्रश्न म्हणजे ‘रोज काय भाजी करावी?’ मुलांसाठी, पाहुण्यांसाठी वा काही खासप्रसंगी काहीतरी वेगळे, नावीन्यपूर्ण भाज्यांचे प्रकार करावेत, असे प्रत्येक गृहिणीला वाटत असते.
घरी आलेल्या पाहुण्यांना तुमच्या सुग्रणपणाची चव चाखायला मिळेल अशा काही विशेष भाज्या तुम्ही या पुस्तकाच्या मदतीने घरच्या घरी करू शकता ज्यांचा समावेश केवळ हॉटेल्सच्या मेनूत असतो. दम आलू, पालक पनीर अशा पंजाबी भाज्यांशिवाय पिकलेल्या केळीच्या भाजीसारख्या काही झटपट होणाऱ्या भाज्या; तसेच काही चटकदार रस्साभाज्याही आहेत. महाराष्ट्रीयन गृहिणी झणझणीत भाज्यांकडे कसे बरे दुर्लक्ष करू शकेल! म्हणून मसालेदार पनीर, सोयाबीन यांच्या जोडीला जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या भरलेल्या भाज्या आणि मिक्स डाळीची भाजी, फणसाची भाजी अशा चविष्ट; पण तितक्याच पौष्टिक भाज्यांच्या पाककृतीही तुमच्या दिमतीला सज्ज आहेत.
आजची सुजाण गृहिणी चवीइतकीच पौष्टिकतेबाबतही जागरूक असल्याने उसळी, सोयाबीन, पनीर, मशरूम इ. पोषणमूल्यांच्या बाबतीत उजव्या असणाऱ्या पदार्थांच्या चविष्ट भाज्या कशा बनवाव्यात याचीही पुस्तकात माहिती देण्यात आली आहे. पानाची शोभा वाढविणाऱ्या व महिलांना कौतुकास पात्र ठरविणाऱ्या या भाज्या नक्कीच हॉटेलिंगचे वेगळ्या चवींचे सुख देतील व सर्वांच्या पसंतीस उतरतील.
तेव्हा आता ‘रोज काय भाजी करावी?’ या प्रश्नाच्या भुताला कायमचे बाटलीबंद करून टाका व दररोज व खास दिवशीही आपल्याला आरोग्य प्रदान करणाऱ्या लज्जतदार भाज्यांचा आस्वाद घ्या.