तुमच्याकडं सगळं आहे, नसेल तर तुम्हाला ते हवं आहे. सत्ता, संपत्ती, अधिकार आणि सौख्य मिळविण्यासाठी काहीही करण्याची तुमची तयारी आहे. यावेळी तुम्ही शरीराची चिंता करीत नाही, मनाची काळजी करीत नाही, तुम्हाला काळजी असते उद्याच्या अस्थिरतेची तुम्ही दुसऱ्याची, समाजाची, देशाची आणि जगाचीसुध्दा चिंता करता. पण तुमच्या शरीराची-मनाची काळजी घेणं गरजेचं वाटत नाही यावर तुम्ही सांगता, मला वेळ नाही. मग गाडी येते, माडी येते, सत्ता-संपत्ती, अधिकारांची झूलही येते, आणि शांती समाधानाची झोप मात्र हरवून जाते. सगळ्यांचं हे असंच असतं, कमी-अधिक असेल पण नक्की घडतच असतं. शरीर-मन पोखरलं जातं, आम्लपित्त, मधुमेह, मलावरोध, रक्तदाब, श्वसनांच्या विकारासोबत हृदयविकारापर्यंत प्रवास कधी झाला कळतच नाही. हे सगळं वरील ताणतणावांचं बायप्रॉडक्ट ! कदाचित तुमचा वरील आजारांचा प्रवास सुरु झाला नसेलही तरी यापुढील आयुष्य आनंदी निरोगी जगण्यासाठी एस.एस.वाय. पध्दतीची योगसाधना आणि प्राचीन भारतीय शिवांबू, अर्थात स्वमूत्र चिकित्सा हा शरीर-मनाच्या आरोग्य रक्षणाचा एक मार्ग आहे.
बाबा भांड हे प्रयोगशील लेखक, प्रकाशक म्हणून परिचित आहेतच. गेली बारा वर्षं शरीर-मनाच्या संतुलनासाठी ते सिध्द समाधी योग (एस.एस.वाय.), आर्ट ऑफ लिव्हिंग, बिहार योगधाम, विपश्यना, आणि शिवांबूचा स्वत: अनुभव घेत आहेत. लेखन व्यवहाराबरोबर शरीर-मनाच्या आरोग्याचं महत्त्व त्यांनी ओळखलं आहे. त्यांचे योग-शिवांबूचे हे अनुभव शरीर-मनाच्या स्वास्थ्यासाठी सजग असलेल्यांना विनाऔषधानं रोगनिवारण्याचा आपला मार्ग शोधण्यास मदतच करतील.
|