Your cart is empty now.
गेल्या शंभरेक वर्षांत महानुभावांच्या साहित्यावर सांप्रदायिक आणि संप्रदायिकेतर संशोधक-अभ्यासकांकडून विपुल लेखन झाले असले, तरी महानुभावीय सांप्रदायिक व्याख्यानपद्धती आणि आधुनिक महानुभावीय व्याख्यानपद्धती या उभय पद्धतींचे सविस्तर अध्ययन-अध्यापन झालेले नाही. प्रा. बापट यांचा प्रस्तुत दोन भागांचा ग्रंथ त्याच्या नावाप्रमाणे महानुभाव वाङ्मयाच्या व्याख्यानपद्धतीचे चिकित्सक समालोचन आहे. महानुभाव संप्रदायाचे साहित्य आणि तत्त्वज्ञान यांची इतकी सांगोपांग चर्चा करणारा दुसरा ग्रंथ माझ्या अवलोकनात नाही. व्याख्यानपद्धतीचे चिकित्सक समालोचन करताना व्याख्यानांची म्हणजेच साहित्याची आणि तत्त्वज्ञानाची चर्चा आपोआपच होऊन गेली. म्हणजेच या ग्रंथाची फलश्रुती दुहेरी आहे. संप्रदायाच्या विशाल साहित्याचा व सखोल तत्त्वज्ञानाचा परिचय होणे आणि या परिचयातून व्याख्यानपद्धतीचेही आकलन होणे - हे दोन्ही प्रवाह ग्रंथामध्ये एकवटले आहेत इतके म्हणण्याइतपत परस्परांत मिसळले आहेत, ती गुंफण हेच एक या ग्रंथाचे स्वतंत्र वैशिष्ट्य होऊन बसले आहे. डॉ. बापट यांचा ग्रंथ म्हणजे महानुभावांच्या व्याख्यानवाङ्मयाचे एक महाव्याख्यानच ! डॉ. सदानंद मोरे
Added to cart successfully!