Your cart is empty now.
'विहिरीत अंधार आहे. डोकावून पाहिलं तर भोवळ वगैरे येईल इतपत अंधार. अंधारात काहीही असू शकतं; काहीहीम्हणजे काहीही. पण ते काहीही म्हणजे नेमकं काय? हे आत उतरल्याशिवाय कळणार नाही. आजवर आयुष्यातल्या अप्रिय, असह्य, नको असणाऱ्या गोष्टी मी विहिरीत टाकल्या. अगदी अडगळीत टाकाव्या तश्या टाकल्या. पण विहीर म्हणजे अडगळ नाही. विहिरीत आई आहे, अण्णा आहेत. विहिरीत काकूचं बाळ आहे, नंदाकाका आहे. विहिरीत दमी, तायडी आणि सुपडीही आहे. विहिरीत अनेक उत्तरं आहेत. अशा प्रश्नांची उत्तरं जे प्रश्न मला कधी पडलेच नाहीत; किंवा जे प्रश्न मी स्वत:ला कधीच पाडून घेतले नाहीत; किंवा असे प्रश्न ज्यांची उत्तरं मी कधी शोधलीच नाहीत. विहीर माझ्या आयुष्याचा रहस्यभेद आहे, जो अनेकदा शक्य असूनही मी आजवर कधीही केलेला नाही. विहिरीत उतरणं हे माझं प्राक्तन नाही. विहिरीत उतरणं हा मी राजीखुशी निवडलेला एक पर्याय आहे. बाहेरच्या वास्तवाला तोंड देण्यापेक्षा विहिरीत लपून बसणं कधीही सोपंच.'
Added to cart successfully!