श्रीमती मालतीबाईंना ९० वर्षांचे प्रदीर्घ जीवन लाभले. त्यांनी शेवटच्या वर्षात कुठल्याही टिपणांचा आधार न घेता 'विरंगुळा' म्हणून लिखाण केले. ते पुढे-मागे प्रसिद्ध करावे अशी त्यांची कल्पना नव्हती. परंतु त्यांना मुलींप्रमाणे असलेल्या त्यांच्या भाच्या सौ. विजया लोकगारीवार आणि सौ. नीला बापट यांनी मालतीबाईंचे कार्य काही लोकांना तरी ज्ञात व्हावे म्हणून खाजगी वितरणासाठी काही मोजक्या प्रती काढल्या. 'विरंगुळा' प्रकाशन कार्यक्रमाच्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी पुणे-मुंबई प्रवासात मी 'विरंगुळा' वाचले आणि मालतीबाईंच्या जीवनाचा अद्भुत प्रवास पाहून अक्षरशः थक्क झालो. त्यांचा माझा परिचय जरी ५० वर्षांपेक्षा अधिक काळाचा होता तरी तो फारच वरवरचा होता हे चरित्र वाचल्यावर जाणवले. इतकेच नव्हे तर भारतीय जनसंघाच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांनी केलेले कार्य म्हणजे केवळ महिलांसाठीच नव्हे तर सर्व सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांसाठी अमूल्य ठेवा आहे, प्रेरणादायक म्हणून तो सर्वांना माहिती व्हायला पाहिजे असे मला वाटले. ज्या काळात आणि ज्या प्रकारचे कष्ट त्यांनी घेतले त्याला तोड नाही. केवळ राजकीय कार्यकर्त्यानांच नव्हे तर सामाजिक जीवनात काम करणाऱ्यांसाठीही त्यांचे जीवन सर्वार्थाने आदर्शवत् 'रोल मॉडेल' आहे. आहे