Your cart is empty now.
माणसाच्या मनाचा एक कोपरा घरांच्या रंगीबेरंगी आठवणींनी व्यापलेला असतो. माणसाचं माणसाशी जसं जिव्हाळ्याचं नातं असतं तसंच घराशी असतं. घराचा निरोप घ्यायची वेळ व्याकूळ करणारी असते. विरह सोसेनासा असतो. घर आपलं जिवलग बनतं म्हणूनच प्रिय व्यक्तीसारखी घराचीही आस लागते. पाय घराकडे ओढतात. घराच्या भिंती थकलेल्यांना पोटाशी घेतात. घर केवळ सुखकर विश्रांतिस्थान नसतं. घरांना माणसांसाठी आणि माणसांना घरासाठी खूप सोसावं लागतं. घराची सत्त्वपरीक्षा होते ती संकटकाळात. अशा प्रसंगी माणसांना समंजसपणे घर सावरावं लागतं. ज्या घरांचा पाया मजबूत असतो; खांबांचा कणा ताठ असतो; भिंतींपाशी सोसायची ताकद असते; तीच घरं उन्मळून पडतापडताही सावरू शकतात.
माणसाच्या भावजीवनातील या उत्कट नातेसंबंधाचा बहुस्तरीय शोध या पुस्तकात अंजली कीर्तने यांनी घेतला आहे. बाळपणीच्या रम्य परिसरातील घरं, लघुपट निर्मितीसाठी शोधलेली घरं, परदेशप्रवासात गवसलेली घरं आणि वाचनातून मनात स्थानापन्न झालेली घरं, यांची व्यक्तिचित्रं त्यांनी आपल्या रसपूर्ण शैलीत रंगवली आहेत. चिंतनाची डूब असल्यानं लेखनाची अर्थसघनता वृद्धिंगत झाली आहे.
Added to cart successfully!