सधन जमीनदारांच्या घरात जन्माला आलेले मुरलीधर देवीदास आमटे हे स्वभावत: बंडखोर वृत्तीचे, आयुष्य भरभरून जगण्याची इच्छा असलेले! पण आयुष्यात फार लवकर एका गोष्टीची त्यांना तीव्रतेने जाणीव झाली; आपल्याला जगायचंय ते स्वत:साठी नाही, तर दुस-यांसाठी. अन्यथा हे सारं वैभव, हा मानसन्मान, ही बुद्धिधमत्ता... हे सगळं फोल, तकलादू, बेगडी ठरेल. ...मग सुरुवात झाली ती आनंदवनात कुष्ठरुग्णांसाठी उभारलेल्या वसाहतीने. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता आणि सलोखा यांचा पुरस्कार करण्यासाठी भारताच्या पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण टोकांना जवळ आणणारं भारत जोडो अभियान झालं. त्यापुढचं पाऊल म्हणजे बाबांचं नर्मदा खो-यातील दहा वर्षांचं प्रदीर्घ वास्तव्य. सरकारने पर्यावरणाचा योजनाबद्ध विनाश चालविला होता, त्यामुळे होरपळून निघणा-या कुटुंबांच्या पाठीशी, बाबा उभे राहिले. हे सर्व करीत असताना पाठीच्या कण्याच्या असाध्य व्याधीने त्यांच्या शरीराला ग्रासून टाकले होते. बाबांच्या ध्येयस्वप्नांची व्याप्ती किती मोठी आहे, याचं तळपतं उदाहरण म्हणजे बाबा आमटे यांच्या मुला-नातवंडांच्या तीन पिढ्यांनी आजवर हजारो लोकांची आयुष्यं आमूलाग्र बदलून टाकली आहेत. बाबांच्या स्वप्नांची पूर्तता होण्यामागे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अदम्य इच्छाशक्तीचाही फार मोठा वाटा आहे. बाबांशी तासन्तास मारलेल्या मनमोकळ्या, अनौपचारिक गप्पा, त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि निकटवर्तीयांच्या मुलाखती या सर्वांमधून निर्माण झालेलं बाबांचं हे चरित्र म्हणजे बाबांना ओळखणा-या असंख्य माणसांची सामूहिक स्मरणगाथाच आहे. सहवेदना, करुणा, निरपेक्ष बुद्धीने केलेली सेवा, या सर्वांचं जितंजागतं प्रतीक असणाNया आपल्या काळातील व्यक्तींचं – ताई आणि बाबांचं – हे यथार्थ चित्रण आहे!