तटबंदीआडच्या आयुष्याचा धीट आणि थक्क करून सोडणारा लेखाजोखा ३१ ऑगस्ट, २००८ रोजी सिस्टर जेस्मी यांनी कॉन्व्हेंट सोडलं. ‘नन’ म्हणून कॉन्व्हेंटमध्ये राहत असताना तेहेतीस वर्षांत आलेल्या अनुभवांचं भारतातलं हे पहिलंच पुस्तक आहे. जेस्मी एका चांगल्या घराण्यातील, उत्साही, सुखवस्तू मुलगी. अल्लड, पुलपाखरी वृत्तीची. घरात पहिल्यापासून कॅथॉलिक धर्मश्रद्धा जपलेल्या. वयाच्या सतराव्या वर्षी ज्युनिअर कॉलेजमधील एका प्रार्थना शिबिराच्या वेळी र्धािमक जीवनाकडे आकृष्ट झाली. सात वर्षांनी व्यावसायिक नन झाल्यानंतर, कॉन्व्हेंटमध्ये वाढीस लागलेले अनेक गैरप्रकार तिच्या लक्षात आले, पण त्याबद्दल चकार शब्दानेही बोलण्यास बंदी असल्यामुळे तिची मनातल्या मनात घुसमट झाली.कॉलेजमध्ये प्रवेश देताना होणारा भ्रष्टाचार, प्रीस्टस् आणि नन्स यांच्यातील लैंगिक संबंध, तसेच नन्सचे आपापसांतील समिंलगी संबंध, गरीब आणि अशिक्षित सिस्टर्सना कमी लेखून शारीरिक कष्टाची कामे करवून घेणं, प्रीस्ट आणि नन्स यांना मिळणा-या सुखसोयी आणि स्वातंत्र्य यातील कमालीची तफावत हे सगळं पाहून तिच्या जिवाची तडफड होई. ‘आमेन’ हे एक संवेदनशील, प्रांजळ आत्मकथन आहे. ते वाचणा-याला थक्क करून सोडते. नन्स आणि प्रीस्टस् यांच्या वास्तव जीवनाबद्दलची हकिकत वाचून चर्चची पुनर्रचना होणं किती गरजेचं आहे या मुद्यावर प्रकाश पडतो. कॉन्व्हेंटच्या किल्ल्याबाहेर राहूनसुद्धा जोगिणीचं जीवन जगणा-या सिस्टर जेस्मीचं अभंग चैतन्य, चर्चवर आणि येशूवर असलेली असीम श्रद्धा यांमुळे वाचक भारावून जातो.