डॉ. अनंत पां. लाभसेटवार यांनी ‘अमेरिकेतील पापनगरी एक वारी’ या पुस्तकातून ‘लास वेगास’ या रंगीत पर्यटनस्थळाचे वर्णन केले आहे. जगभरात या शहराला पापनगरी (SIN CITTY) म्हणून ओळखले जाते हे शहर जुगाराची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. इथे जुगार कायदेशीररित्या खेळला जातो. मनुष्याच्या वामप्रवृत्तींना योग्य वातावरण मिळालं की त्या अधिकच उफाळून येतात आणि त्यापासून अमाप पैसा मिळवता येतो. हे तत्त्व पटवून देणारं हे ठिकाण आहे. मनुष्याच्या मनोदौर्बल्याचा फायदा घेणारी अनेक ठिकाण इथे आहेत. लास वेगासला जाताना अगदी विमानात बसल्यापासून लेखकाला आलेले अनुभव त्याने सांगितले आहेत. माहितीपूर्ण आणि तरीही मनोरंजक असे हे प्रवासवर्णन आहे. लास वेगास मधील हॉटेल्स तेथे चालणारे ‘शोज’ त्यांची वैशिष्ट्ये, उत्कृष्ट स्थापत्यकला याबरोबरच मद्याचे वाहणारे पाट, अर्धनग्न मदिराक्षी, कधीही बंद न होणारी जुगारगृह, उघडपणे चालणारा शरिरविक्रय सर्व प्रकारच्या व्यसनांची उपलब्धता यांचेही इत्यंभूत वर्णन लेखकाने केले आहे. पायदळी तुडवली गेलेली नितिमत्ता, मूल्यांचा नाश, जुगारात पैसा गमावल्याने होणारी निराशा या बरोबरीने काही गुणसंपन्न गोष्टीही येथे अनुभवास येतात. जसे समुद्रकिनाNयापासून आयपेÂल टॉवरपर्यंत सर्व काही येथे कृत्रिम असूनही या कृत्रिमतेत सत्याचा आभास निर्माण होतो आणि तणावग्रस्त चिंतीत मन काही काळ का होईना विरंगुळा पावते. या ठिकाणाचे अजून एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे माफक दरात उत्तम प्रतीचे अन्न मिळते. जगातील अनेक नामवंत शेफ्सनी आपली रेस्टॉरंट्स येथे उघडली आहेत. फ्लोरिडा या ठिकाणी असणारे डिस्नीलँड हा परिकथेतील स्वर्गच आहे दरवर्षी लक्षावधी लोक या ठिकाणाला भेट देतात. भारतातील तिरूपती मंदिर येथेही लक्षावधी भाविक दरवर्षी दर्शनासाठी जमतात. परंतु या दोनही ठिकाणांपेक्षा अधिक पटीने लोक लास वेगासला या ठिकाणी भेट देतात हे कळल्यावर आश्चर्य वाटते आणि मनुष्य मुळातच पापप्रवृत्त आहे याची खात्री पटते. प्रत्यक्ष पाप न करताच पापनगरीच्या संस्कृतीची सफर घडवणारे हे पुस्तक वाचकांचे नक्की मनोरंजन करेल.पापनगरीच्या भेटीला जाताना कुणी अंतर्मनाचा वेध घेत नाही.