स्वातंत्र्य संग्रामातील कार्य हा बहुसंख्य स्त्रियांच्या दृष्टीने त्यांच्या परंपरागत कार्याचा थोडाफार विस्तार होता. तरीही फार थोड्या साहसी स्त्रियांनी परंपरा झुगारून त्यांच्या परंपरागत आणि दुय्यम दर्जाविरुद्ध बंड पुकारले, आणि स्त्रीवादी व राष्ट्रवादी भूमिकांचे एकत्रीकरण केले. कोणतेही पद किंवा सत्ता यांची अभिलाषा न धरता त्यांनी नि:स्वार्थपणे देशसेवा केली. राष्ट्रीय चळवळीला प्रथमच राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्वरूप प्राप्त झाले. परिणामी मोठ्या संख्येने स्थानिक व प्रादेशिक स्तरावर उत्साह दिसून आला. त्यामुळे प्रदेश, वर्ग, जाती, लिंग व धर्म यांचे अडसर भारतीय इतिहासात दीर्घ कालांतराने दूर झालेले दिसले. समानतेच्या तत्त्वज्ञानात, सामाजिक न्यायात, निधर्मीवादात आणि राष्ट्रवादात झिरपलेली पायाभूत भावनिष्ठा स्पष्ट झाली. स्वातंत्र्याचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी ही भावनिष्ठा सर्वत्र हळूहळू झिरपून चळवळीला मार्गदर्शक ठरली.