प्रति, श्री. ना.रा. वडनप यांसी सादर प्रणाम ! ‘बुध्दिबळाचा ओनामा’ या आपल्या पुस्तकाबद्दल आपले आभार मानावे तितिके थोडेच ! बुध्दिबळाचा या खेळाविषयी मला फार उत्सुकता होती. परंतु नक्की तो कसा खेळावा याविषयी आमच्या घरात कोणालाच माहिती नव्हती. त्यामुळे बुध्दिबळाचा पट घरी आणल्यावर काही प्राथमिक गोष्टी माहित होत्या. म्हणजे सर्व बुध्दिबळाच्या चाली, त्यानुसार आम्ही आपले खेळू लागलो. शेवट फक्त राजाला कुठूनही मारण्यात होऊ लागला. बरोबरी माहितच नव्हती. पण ह्या खेळाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी म्हणून जे पुस्तक मिळाले ते सुदैवाने आपलेच मिळाले आणि संपूर्ण पुस्तक वाचल्यावर आमच्या अगोदरच्या खेळाचे हसू यायला लागले. अगदी गंमत वाटायला लागली. खरचं, आपण इतक्या सोप्या तहेने हे नियम समजावून दिले आहेत की कोणीही ह्या खेळाला क्लिष्ट समजणार नाही. पहिले महाराष्ट्र टाईम्स मध्ये येणारे डाव मी पाहायचे, तेव्हा आपल्याला ह्यातलं काहीएक समजत नाही म्हणून दुर्लक्ष करायचे. आता तर सबंध डाव सोडवूनच उठते. हा खेळ अजिबात डोकेदुखी वाटत नाही; जो जो खेळावा तो तो अधिकच आवड उत्पन्न होते. पुन्हा एकदा आपले अभिनंदन व आभार तसेच ह्या खेळासंबंधी अधिक पुस्तके लिहिण्याचा आपला जो मानस आहे तो पार पाडावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना, कळावे. तुम्ही बुध्दिबळ खेळातले नवशिके असा किंवा नियमित खेळाडू असा वरील बोलका अभिप्राय सांगतो की, हे पुस्तक मार्गदर्शक म्हणून तुम्हाला नित्य संग्रही ठेवावेसे वाटेल !