काही वर्षांपूर्वी एका पत्रकाराने काही वेगळेच क्षण अनुभवले होते.कानपूर ते मद्रास प्रवासादरम्यान इटारसी स्थानकावर विश्वनाथ घोष पाय मोकळे करायला आणि एक कप चहा प्यायला उतरले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, लाखो प्रवासी त्यांच्या मुक्कामाकडे जाणारी पुढची गाडी येण्यापूर्वी इटारसीसारख्या जंक्शनवर कदाचित करोडो तासांचा वेळ घालवत असतील. पण स्थानकापलीकडचे शहर कसे आहे हे शोधण्याची कधी कोणी तसदी घेत नाही. लेखक म्हणतो, ``भारतातील रेल्वे स्थानके ही शहरांना आणि गावांना जोडणा-या प्रदेशातील उत्कंठावर्धक अशी स्वतंत्र राज्ये आहेत. ती स्थानिक जीवनाच्या स्वादापासून पूर्णपणे भिन्न असतात. जणू दिल्लीतील एकाच अधिकाऱ्याच्या अखत्यारीतील तो एक वेगळाच प्रदेश असतो, रेल्वेच्या शिट्ट्यांच्या सहवासात लहानाचे मोठे झालेले लोक आणि त्यांचे जीवन याबद्दल जाणून घेण्यासाठी घोष मुद्दाम ह्या शहरांमध्ये फिरले. इटारसी, मुघलसराई, अरक्कोनम, जोलारपेटाई, झाशी, शोरानूर आणि गुंटाकल अशा विविध उत्कंठावर्धक नावांच्या शहरांमधून त्यांनी केलेला हा प्रवास....!``