वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षांपर्यंत नाचणारी-बागडणारी-उत्साहानं सळसळणारी एक मुलगी... अचानक पाठीच्या दुखण्यानं अंथरुणाला खिळते आणि पॅराप्लेजिक होऊन चाकाच्या खुर्चीवर जाऊन बसते...! सुरुवातीला अंतर्बाह्य उन्मळून पडते, पण नंतर त्यातूनच जन्माला येतं एक नवं व्यक्तिमत्त्व. नसीमा हुरजूक.अपंगांसाठी झटणारी एक संवेदनशील स्त्री. अपंगांना सहकार्याचा हात पुढे करणं, त्यांना जीवन सुसह्य करून देणं, स्वत:च्या पायावर उभं करणं, त्यांच्यात आत्मप्रतिष्ठेची भावना जागवणं, हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे. वास्तवाचं उचित भान ठेवून त्या स्वप्नं बघतात आणि मग ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी बेभानपणे धावतात, आपल्या चाकाच्या खुर्चीतून... ‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूर’ ही संस्था, वसतिगृहं, प्रशिक्षण केंद्रं, गॅस एजन्सी... त्यांच्या कार्याचा व्याप झपाट्यानं वाढतो आहे. ‘फाय फाउंंडेशन’सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या, प्रचंड जिद्दीच्या स्त्रीचं हे आत्मकथन. ओघवत्या शैलीतलं, निखळ प्रामाणिक, चित्रदर्शी, काळजाला भिडणारं...