`गे` जीवनाच्या अंधकारमय कोशातून बाहेर पडण्याचा हा अखेरचा मार्ग असल्याचे सूचित करण्याचा प्रयत्न लेखकांंनी या पुस्तकामधून केला आहे. दोन पुरुषांमधील कामजीवनाचे वर्णन करणाऱ्या या कथा, परंपरागत रूढीमध्ये बंदिस्त असलेल्या समाजातील वाचकांच्या पचनी पडण्यासारख्या नाहीत. त्यामुळे ते चक्रावून जाण्याची शक्यता आहे. या पुस्तकातील मोहनस्वामीच्या कथांमध्ये लैंगिक जीवन, नागरीकरण आणि जातीपातींमधील संघर्ष यांचे रोखठोक आणि काहीशा स्पष्ट शब्दांत केलेले वर्णन वाचकांना अचंबित करण्याची शक्यता आहे.इंग्लिश , तेलुगू, मल्याळम् आणि स्पॅनिश भाषांमधून अनुवादित झालेल्या या पुस्तकाची मराठी आवृत्ती वाचकांसमोर ठेवून कन्नड साहित्याच्या एका महत्त्वाच्या पैलूचा परिचय करून देण्याचा आमचा मनोदय आहे. कार्तिक नावाच्या आपल्या दीर्घकालीन मित्राला मोहनस्वामी पारखा झाला आहे. एका सुंदर मुलीने कार्तिकला त्याच्यापासून हिरावून घेतले आहे. सर्व जुन्या आठवणी चितेप्रमाणे त्याला जाळत आहेत. तसे पाहिले, तर त्याची अपेक्षा काही फार मोठी नाही. एक साधे, सरळ मानाचे जीवन जगण्यासाठी तो धडपडत आहे. पुरुष गणिका, वाघीण अशी घाणेरडी नावे देऊन समाजाने त्याच्या मनावर जखमा केल्या आहेत. गतजीवनातील मनाला झालेल्या जखमा, अपमान, भीती, आतंक आणि वैफल्य हे सर्व विसरून नवीन जीवनाची वाटचाल सुरू करण्याची त्याची इच्छा आहे. त्यासाठीच आटापिटा सुरू आहे.