कॅन्सरसारख्या रोगाशी लढणं सोपं नसतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत कॅन्सरचं निदान होतं, तेव्हा त्या व्यक्तीची आणि कुटुंबीयांची काय अवस्था होते, या रोगाचे आर्थिक, कौटुंबिक परिणाम कसे होतात, त्या रोगावर कोणते उपचार केले जातात, उपचारांदरम्यान त्या रोग्याची मानसिक, शारीरिक स्थिती काय असते आणि या रोगाला धीरादात्तपणे कसे सामोरे जावे याची माहिती देणारं पुस्तक आहे, ’द जॉय ऑफ कॅन्सर.’ अनुपकुमार यांच्या स्वानुभवातून साकारलेलं हे पुस्तक आहे. एका आंतररराष्ट्रीय कंपनीत उपाध्यक्षपदावर काम करणार्या अनुपकुमार यांची नोकरी गेली. वयाची पन्नाशी उलटलेली, मुलीचं लग्न तोंडावर आलेलं, जाहिरात क्षेत्र मंदीच्या लाटेखाली होतं; त्यामुळे नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होत नव्हत्या. ज्या होत होत्या त्या तरुणांसाठी होत्या. एकूण अशी निराशाजनक परिस्थिती असताना अबुधाबीतील एका दूरसंचार संस्थेने त्यांना मुलाखतीसाठी बोलावले. त्या नोकरीसाठी अनुपकुमार यांनी वैद्यकीय तपासणी केली. त्या तपासणीदरम्यान त्यांच्या फुफ्फुसावर डाग असल्याचे आढळले आणि मग तपासण्यांचे चक्र चालू झाले. त्या तपासण्यांमधून त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले. त्यांच्या फुफ्फुसावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हा कॅन्सर चौथ्या स्टेजला लक्षात आल्याने अनुपकुमार चार महिन्यांपेक्षा जास्त जगणार नाहीत, असं डॉक्टरांचं म्हणणं होतं; त्यामुळे त्यांच्यावर केमोथेरपीचे उपचारही करू नयेत, असंही डॉक्टर म्हणाले होते; पण अनुपकुमार यांना जगायची तीव्र इच्छा होती. म्हणून त्यांनी केमोथेरपी करायचे ठरवले. केमोथेरपीदरम्यान शारीरिक गुंतागुंत निर्माण झाली; त्यामुळे त्यांना मरणप्राय यातना सोसाव्या लागल्या. त्याचदरम्यान त्यांच्या चालू असलेल्या क्ष-किरण तपासण्या, सीटीस्कॅन त्यांचा कर्करोग हटत असल्याचे दाखवत होत्या. सहा महिन्यांच्या या वेदनामय कालखंडात या पुस्तकाचा बराचसा भाग त्यांनी लिहिला. स्वत: कर्करोगाशी झुंजत असताना कर्करोगाच्या इतर रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी ते संपर्क साधत होते. त्याचाही हे पुस्तक लिहिताना त्यांना फायदा झाला. या पुस्तकात त्यांनी कर्करोगाशी लढण्याचा सातकलमी कार्यक्रम सांगितला आहे. पहिल्या कलमात कर्करोगाचा स्वीकार कसा करायचा याचं मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. दुसर्या कलमात तुम्ही तुमचे उपचार आणि डॉक्टर कसे निवडाल हे सांगितले आहे. तिसर्या कलमात सकारात्मकतेची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. चौथ्या कलमात कुटुंबाच्या, स्नेह्यांच्या आधाराची मांडणी कशी करावी, हे सांगितलं आहे. पाचव्या कलमात उर्वरित आयुष्यासाठी ध्येयनिश्चिती कशी करावी, याबद्दल लिहिले आहे. आरोग्याकडे नेणारा मार्ग मन:चक्षूने कसा पाहावा, हे सहाव्या कलमात सांगितले आहे आणि सातव्या कलमात आहार नियंत्रणाविषयी मार्गदर्शन केले आहे. सगळ्या उपचारांनंतर त्यांना जेव्हा बरं वाटू लागलं त्यानंतरचं त्यांचं जीवन, कॅन्सर परत उद्भवला तेव्हाही त्यांनी त्या परिस्थितीला कसं तोंड दिलं, याबद्दलही त्यांनी या पुस्तकात सांगितलं आहे. या पुस्तकाच्या शेवटी नोंदवलेल्या परिशिष्टामध्ये त्यांनी कर्करोग म्हणजे काय, कर्करोग कशामुळे होतो, कर्करोगाचे प्रकार, कर्करोगाच्या खुणा आणि लक्षणे, कर्करोगावरील उपचार, उपचारांचे आनुषंगिक परिणाम, उपचार चालू असताना घ्यावयाची दक्षता, भविष्यातील कर्करोग उपचार काय असतील याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तसेच विविध कर्करोग संस्था आणि त्यांच्याकडून मिळणार्या मदतीचे स्वरूप याविषयी माहिती दिली आहे. कर्करोगाशी संबंधित इंठाजी शब्द आणि त्यांचे अर्थ समाविष्ट केले आहेत.