Your cart is empty now.
श्री. सुरेश देशपांडे यांनी एक अतिशय मजेदार पुस्तक वाचकांच्या हाती दिल आहे. हे पुस्तक त्यांनी जपलेल्या अनोख्या छंदातून निर्माण झालं आहे. वन्यजीवांच्या अजब करामतींविषयी ठिकठिकाणी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणं जपून ठेवण्याचा त्यांना छंद आहे. या जपलेल्या पोतडीतून ते आता वाचकांसाठी घेऊन आले आहेत चटपटीत, चविष्ट आणि गमतीदार गोष्टींच्या ओंजळी! या गोष्टींत डॉलरच्या हजारो नोटा वापरून वाहत्या नाल्यावर बंधारा बांधणारं जलमांजर, पैशाचं पाकीट पळवणारा पोपट, संजीवनी बुटी आणून देणारं माकड, दारू पिऊन गोंधळ घालणारा हत्ती आणि तुटलेल्या पायाऐवजी लोखंडी चाक लावून फिरणार कासवही आहे. वाचकांच मनोरंजन करू शकेल आणि त्यांच्या ज्ञानात भर घालू शकेल असं या पुस्तकात खूप काही आहे. पुस्तकातून वने, वन्य पशू-पक्षी आणि जैवविविधता याबद्दल भरपूर माहिती मिळते. इतकंच नव्हे तर त्यांनी प्रसिद्ध पशु-पक्षी तज्ज्ञांची शब्दचित्रही रेखाटली आहेत. विशेष म्हणजे हे लिहिताना निसर्ग, वने आणि वन्य प्राणी यांचा होत चाललेला नाश पाहून लेखकाला होणारं दुःख आणि त्याच्या मनातील पोटतिडीक लेखनातून पदोपदी जाणवल्याशिवाय राहत नाही. लेखक लहानपणापासून जंगलात राहिले आहेत. तो त्यांचा वारसा आहे. त्यांनी नोकरीदेखील वन विभागातच केली आहे. सर्व अनुभवांवर आधारित असलेल्या या लेखनाला त्यामुळे एक भक्कम बैठक लाभली आहे हे विशेष ! 'वन्य पशू-पक्ष्यांच्या अजब करामती' हे पुस्तक वाचनीय तर आहेच; पण संग्रही ठेवण्यासारखंही आहे.
Added to cart successfully!