Your cart is empty now.
'चाकोरीतल्या अपयशानं मुळीच खचून न जाता चाकोरीबाहेरचा छंद मनापासून जोपासणा-या एका पोरसवद्या तरुणानं लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे निसर्गप्रेमाचा आगळा आविष्कार आहे. रसायनशास्त्राच्या महाविद्यालयीन परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे हाती आलेलं फावलं वर्ष मदुमलाईच्या जंगलात प्राणीनिरीक्षणात घालवण्याची संधी मिळाली आणि कृष्णमेघच्या मनात लहानपणापासूनच दडलेलं जंगलप्रेम उफाळून आलं. तो वर्षभर त्या जंगलात राहिला, पण एखाद्या उप-या निरीक्षकासारखा नाही तर ख-याखु-या जंगलपुत्रासारखा राहिला. त्या जंगलातले हत्ती, रानगवे, रानकुत्री, अस्वलं यांच्यासारख्या प्राण्यांचं मनमुक्त जीवन त्यानं एखाद्या सहनिवाशाच्या भूमिकेतून निरखलं - पारखलं. त्याच्या त्या शोधयात्रेत आलेल्या सुंदर, थरारक, रोमांचक अनुभवांचं हे नितळ पारदर्शी संकलन म्हणजे जंगलरसात न्हाऊन निघालेलं आणि वाचकांनाही रानवेडाची दीक्षा देणारं मदुमलाई सूक्त आहे. काही पुस्तकं निव्वळ वाचायची नसतात, तर अनुभवायची असतात. मदुमलाईच्या जंगलातला एक तरुणप्रसन्न जीवनानुभव त्यातल्या सा-या चढउतारांसह, रौद्रथरारांसह आणून देणारं हे उत्कट पुस्तक असंच अनुभवण्याजोगं पुस्तक आहे... कृष्णमेघ जेथे रमला त्या मदुमलाईच्या प्रेमात पाडणारं... आणि त्याच्या हातून जे निसटलं त्याबद्दल हुरहूर लावणारं... वाचकांच्या जंगलजाणिवा प्रगल्भ करणारं, सहजसुंदर शैलीतलं...
Added to cart successfully!