‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता’ असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे. ज्या समाजात स्त्रीला सन्मान मिळतो, तिच्याविषयी आदर असतो त्या ठिकाणी परमेश्वराचे अस्तित्व असते. सर्वत्र आनंद असतो. स्त्री हे लक्ष्मीचे रूप, मातृत्वाचे रत्न आहे. त्याचप्रमाणे ती आदिशक्तीचे रूपही आहे. काहीतरी अप्रतिम करून दाखविण्याचे सामर्थ्यही तिच्यामध्ये आहे. अशाच सामर्थ्यशाली भारतीय स्त्रियांची आठवण ‘51 प्रतिभावंत भारतीय महिला’ या पुस्तकाद्वारे करून दिली आहे.
आपला देश आज ज्या प्रगतिपथावर आहे, त्यात स्त्रियांचे योगदान अमूल्य आहे. स्वातंत्र्यसंग्राम, शिक्षण, साहित्य, संगीत, विज्ञान व तंत्रज्ञान, अवकाश संशोधन, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये अग्रगण्य स्थान निर्माण करणार्या महिलांच्या यशोगाथा या पुस्तकातून सर्वसामान्य वाचकांना वाचावयास मिळतात.
ज्या काळी स्त्रियांना शिक्षण घेणे किंवा कोणत्याही क्षेत्रात पुरुषांसोबत काम करणे अगदी अशक्य होते, अशा प्रतिकूल परिस्थितीतही अखंडपणे संघर्षाला तोंड देत, ज्या महिलांनी अशक्यतेस शक्यतेत बदलवून प्रत्येक क्षेत्रात स्वत:चे नाव अजरामर केले अशा 51 प्रतिभावंत भारतीय महिलांच्या कार्यास विसरणे आपणास केवळ अशक्यप्राय आहे.