फार विचित्र आहे हा देश! ते एक रंगीबेरंगी कोळ्याचं जाळं आहे. तिथे नोकऱ्या आहेत, यंत्रतंत्र आहे. सुख संपत्ती आहे, डॉलर्स आहेत. आपली माणसं त्यातल्या कशाला तरी बळी पडून तिथं जातात पण माघारी यायला जमत नाही. तिथून जावं असा आपला देशही नाही. तिथून बाहेर पडण्यासाठी शेकडो खिडक्या आहेत, पण आत बोलावणारा एकही दरवाजा नाही. तिथल्या जीवनाची तुम्हाला कल्पना नाही. सेलमध्ये खरेदी करायची आणि डॉलरला चाळीसनं गुणायचं! असं जगणारी मंडळी सुखी असतात काय? तिथं हजार डॉलर्समध्ये सामान्य काम करत राहायचं आणि इथं चाळीस हजार रुपये पगार मिळतो असं सांगून भाव खायचा. तिथं डॉलर मिळविण्यासाठी आम्ही आपली माणसं, घरदार सगळं सोडून, तिथल्या थंडीवाऱ्याला तोंड देत राहतो, पण तिथल्या समाजाचं अविभाज्य अंग होऊ शकत नाही. फारच महाग पडतो हा डॉलर! पण हे भारतात कुणालाही समाजात नाही. पैशाच्या दलदलीत सापडलोय आम्ही! आमच्या लायकीपेक्षा फार उत्तम नोकरी मिळते तिथे. जाती, भाषा यांचं राजकारण नाही तिथे. सुखानं आपलं आपण काम करू शकतो. तिथलं सगळं सोडून मी इथं आलो तर आलो तर आणखी दु:खी होईन.`