ती आम्रवृक्षाला म्हणाली.... "मी वठलेल्या झाडावर बसले, तर तो सुद्धा मोहरून जाईल!" ती वसंताला म्हणाली.... "मी वाळवंटात गाऊ लागले, तर तिथं सुद्धा नंदनवन निर्माण होईल!" ती उषेला म्हणाली.... "मी संध्याकाळी नुसते कुहू... कुहू केले, तर मावळलेला सूर्य पुन्हा परत येईल!" ती वल्लभ वल्लभांना म्हणाली.... "मी जर दूर देशी गेले, तर तुमचे प्रेमही माझ्याबरोबर उडून जाईल." वर्षाकाळ आला... आंब्याचा मोहर अदृश्य झाला... आभाळातून मुसळधार पाऊस पडू लागला... मेघांच्या पांघरुणातून उषा कधी तरी बाहेर डोकावून पाही; पण ते क्षणभरच!... चांदणी रात्र विझून गेलेल्या यज्ञकुंडासारखी दिसू लागली.कोकिळा पूर्वीप्रमाणे गाण्याचा प्रयत्न करू लागली; पण तिच्या कंठातून सूरच बाहेर पडेनात....