‘सूर्यास्त’ हा मराठी साहित्यातील श्रेष्ठ लेखक कै. वि. स. खांडेकर यांचा कुमारवयातील मुलांसाठीचा कथासंग्रह. खरंखोटं, सुष्टदुष्ट यांच्या संघर्षात अंतिम विजय सत्याचाच असतो, हेही कालातील सत्य आहे; कोणतीही शक्ती मग ती कितीही बलाढ्य का असेना सत्याला जिंकू शकत नाही; सत्य आपल्या आत्मतेजानं झळाळत असतं आणि ते अंगिकारलं, तर ‘अस्त’सुद्धा ‘सूर्यास्ता’सारखा लखलखीत असतो, हे तत्त्व लेखक वि. स. खांडेकर आपल्या कथांतून वाचकांच्या मनावर ठसवतात; आणि जीवनातल्या उच्च मूल्यांची वाचकांच्या मनात प्रतिष्ठापना करतात. त्यासाठी ते अस्सल आणि बेगडी, श्रेष्ठ आणि कनिष्ठ समोरासमोर ठेवतात. कधी आपल्या परखड लेखणीने ते खोट्या ढोंगी प्रतिष्ठेचे मुखवटे फाडतात; तर कधी उपरोधाने खोट्याचा खोटेपणा ठळक करून सत्याचा उदघोष करतात, तर कधी रूपककथांतून सहजतेने जीवनाचं मर्म उलगडून दाखवतात. रूपककथा हे कै. वि. स. खांडेकर यांच्या लेखनाचे सामथ्र्य आहे, हे या कथांतून प्रत्ययास येते.