एक विशी-बाविशीतला मास्तर बनगरवाडीत येतो. पाहता-पाहता वाडीचा होऊन जातो. जीव लावणारा कारभारी, आगापिछा नसलेला आयबू, लोकांच्या शिवारातून चोर्या करून परत त्यांच्या मालकांना मी चोरी केली, असं जाऊन सांगणारा आनंदा, नांगराचं जू मानेवर घेऊन एका बैलाची कमतरता भरून काढणारी, नवरा अंजीच्या नादी लागलाय म्हटल्यावर वेगळी चूल थाटणारी शेकूची बायको इ. विविध स्वभावाच्या व्यक्तिरेखा माडगूळकरांच्या लेखणीतून चित्रदर्शित्वाने, रसरशीतपणे साकारतात. शाळेत तालीम बांधण्यासाठी एक झालेली वाडी, त्यादरम्यानचा संघर्ष आणि तालमीच्या उद्घाटनाला राजा आल्यानंतर गावात ओसंडून चाललेला उत्साह, वाडीतील दैनंदिन जीवन, सुगी, दुष्काळ, लोकरीती, समजुती, दैवतं इ.चं जिवंत चित्रण वाचकाला गुंतवून ठेवतं आणि मास्तराचं वाडी सोडून जाणंही मनाला कातर करतं. मास्तर आणि बनगरवाडीच्या भावविश्वाचं एकत्व अधोरेखित करणारी, मराठी साहित्यातील अक्षर-लेणं असलेली कादंबरी.