संक्षिप्त कादंबरी संच १ Sanshipt Kabambari Sanch 1
संक्षिप्त कादंबरी संच १ Sanshipt Kabambari Sanch 1
‘आनंदी अमेरिकेत जाऊन डॉक्टर झाली’ ही या कादंबरीची कथा! एवढंसं सांगायला एवढी पानं? एकविसाव्या शतकाच्या अतिप्रगत कालखंडातल्या मुलांना नक्कीच असा प्रश्न पडेल. पण ही कादंबरी वाचताना लक्षात येईल की ही कथा जेवढी आनंदी आणि गोपाळराव जोशी यांच्या, आज अविश्वसनीय वाटू शकेल अशा, संघर्षमय आयुष्याची कथा आहे तेवढीच ती त्या काळाची, त्या काळातल्या आयुष्य जखडून ठेवणाऱ्या रूढींची, रूढींना कवटाळून बसलेल्या समाजाचीही कथा आहे.
इंधन - मूळ लेखक हमीद दलवाई
जवळपास पंधरा वर्षांनी आपल्या गावी आलेला हा नास्तिक मुस्लीम पत्रकार म्हणजे स्वतः लेखकच आहे. गावातले जुने ऋणानुबंध नव्याने त्याच्या समोर येतात. तिथले भांडणतंटे सोडवण्यासाठी त्याने दिलेला समझोत्याचा सल्ला कोणाला रुचत नाही. एकेकाळी दिलजमाईने वागणाऱ्या हिंदु-मुस्लीमांमध्ये मतांतराच्या ठिणग्या पडू लागतात. त्यामुळे लेखकाचे संवेदनशील मन विषण्ण होते. देवीच्या पालखीच्या सोहळ्यात धर्माच्या या इंधनामुळे तेल ओतले जाते आणि दंगल पेटते.
खंडाळ्याच्या घाटासाठी - मूळ लेखक शुभदा गोगटे
सह्याद्रीच्या कुशीत मानवाने अथक परिश्रम करून निर्माण केलेल्या खंडाळा घाटाच्या निर्मितीची ही कहाणी. एक प्रकारे माणूस आणि निसर्ग यांच्या दरम्यानच्या संघर्षाचे वर्णनच या कादंबरीत आहे.
टारफुला - मूळ लेखक शंकर पाटील
कोल्हापुरात दऱ्याखोऱ्या आणि डोंगरांच्या घळींनी वेढलेलं एक गाव. या गावचा पाटील अकस्मात मरण पावतो आणि गावावर वर्चस्व मिळवण्यासाठी संघर्ष सुरु होतो. तीन पिढ्या सुरु असणाऱ्या या संघर्षात माणसाच्या चांगल्या-वाईट गुणांपासून स्वातंत्र्याच्या वाऱ्यापर्यंत अनेक पदर मिसळलेले आहेत.
वीरधवल - मूळ लेखक नाथमाधव
सत्याश्रायाने आपल्या मुलाप्रमाणे वाढवलेल्या पोरक्या वीरधवलच्या आयुष्यात अनेक अद्भुतरम्य प्रसंग आहेत. चण्डवर्म्यासारख्या बलाढ्य शत्रूशी नियती त्याची जन्मतःच गाठ घालून देते. पण, कीर्तीवर्म्याचे पिशाच्च वीरधवलची कशी पाठराखण करते आणि वृद्ध वनचरी त्याला वेळोवेळी मदत करते. अशा तऱ्हेने तो आपल्या शत्रूंवर कशी मात करतो याची उत्कंठावर्धक कथा.