अत्यंत प्रतिकूल परिपरिस्थितीमध्ये पुरेसे शिक्षण नसताना जीवशास्त्रीय सिद्धान्त मांडणारे थोर संशोधक अशी आल्फ्रेड रसेल यांची जगाला ओळख आहे. काळाच्याही पुढे जाऊन संशोधक दृष्टीने जगाला पथदर्शक ठरेल, असे कार्य करणारा द्रष्टा शास्त्रज्ञ, अशी इतिहासाने त्यांची नोंद घेतलेली आहे. आठ भावंडांसह मोठे कुटुंब असल्यामुळे आई-वडिलांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. त्यामुळे लहानपणापासूनच ते स्वतंत्र बाण्याचे होते. त्यांच्या अभिजात शोधक वृत्तीला अनुकूल असे वातावरण घरात नव्हतेच. मोठ्या भावाची मदत आणि भावनिक आधार एवढीच त्यांच्या जमेची बाजू. पुढे उदरनिर्वाहासाठी घड्याळे दुरुस्ती, दागिन्यांवरील कोरीवकाम, भूमापन आणि सर्वेक्षण क्षेत्रात त्यांनी कामे त्यांनी केली. भूमापन आणि भूगोल या आपल्या आवडत्या उद्योगात ते मग्न झाले. आलफ्रेड रसेल वॅलेस यांचे चरित्र अनेक अद्भुतरम्य घटनांनी भरले आहे. एक विचारवंत म्हणूनही ते गाजले. गेल्या शतकातल्या अनेक इंग्रज शास्त्रज्ञांपेक्षा त्यांचे वागणे वेगळे ठरते, ते त्यांच्या सामाजिक जाणिवेमुळे. डार्विनबरोबर वॅलेस यांचे नाव उत्क्रांतिवादाशी निगडित झाले होते, पण त्याबरोबर त्यांनी इतरही अनेक क्षेत्रांत काम केलं. खरं तर; पहिला पर्यावरण शास्त्रज्ञ म्हणूनही त्यांचा गौरव व्हायला हरकत नाही. मराठीत काही स्फुट लेख सोडले, तर वॅलेस यांच्या इतर कार्याची माहिती देणारे चरित्र मराठीत नाही; या छोटेखानी चरित्रामुळे ती उणीव अशंत: तरी भरून निघावी. उत्क्रांतीबाबत डार्विन-वॅलेस यांनी सिद्धान्त मांडला असला तरी वॅलेस त्यांना वडिलकीचा मान देऊन गुरू मानत असत. या सिद्धान्तामागे उभयतांचा सहभाग असला तरी वॅलेस त्याला ‘डार्विनिझम’ म्हणत असत. वॅलेस पूर्णपणे नास्तिक होते. शिक्षणपद्धतीवर धर्माचे पोथीनिष्ठ वर्चस्व असू नये, असे त्यांचे परखड विचार होते. धर्मातीत शिक्षणावरच त्यांचा भर होता. १८६६ मध्ये त्यांचा विवाह मेरी मिटेन हिच्याशी झाला. आयुष्यभर वेगवेगळ्या विषयांच्या तळाशी जाऊन, त्याबद्दलच्या ग्रंथसाहित्याचे वाचन-मनन करून ते ज्ञानसंकलन करत राहिले. प्राप्त केलेल्या ज्ञानावर विचारमंथन करून त्यांनी अनेक माहितीपर ग्रंथ लिहिले. त्यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांना श्रोत्यांची गर्दी होत असे. वेगवेगळ्या विषयांतील परिपूर्ण ज्ञान असलेल्या व्यक्ती- संशोधक- शास्त्रज्ञ- विचारवंत यांच्याशी त्यांनी स्नेह जोडला होता. त्यांच्याशी होणाऱ्या चर्चेतून वॅलेस यांनी आपली ज्ञानक्षुधा शमवली. झुंजार वृत्तीचे वॅलेस कळकळीचे समाजसुधारक होते. डार्विन यांचा उत्क्रांतिवाद मानवनिर्मितीपर्यंत थांबतो; तेव्हा वॅलेस यांनी उत्क्रांतीची प्रक्रिया यापुढेही सुरू राहील; मात्र ती मानसिक असेल, असा पूरक सिद्धान्त मांडला. अशा या सामाजिक बांधिलकीचे पूर्ण भान ठेवून आयुष्यभर वावरणाऱ्या चतुरस्र शास्त्रज्ञाचे इ.स. १९१३ मध्ये निधन झाले. अखिल विश्वाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आल्प्रेÂड वॅलेस यांच्या सारखे शास्त्रज्ञ निर्माण व्हायला हवेत. वॅलेस यांच्यावर मराठीतून अन्य साहित्य उपलब्ध नाही; त्यामुळे त्यांच्या जीवन-कार्याविषयी माहिती घेण्यासाठी वाचकांनी हे छोटेखानी चरित्र अवश्य वाचावे.