Bharat Ani Purvekadil Deshatil Pravas भारत आणि पूर्वेकडील देशातील प्रवास
Bharat Ani Purvekadil Deshatil Pravas भारत आणि पूर्वेकडील देशातील प्रवास
Couldn't load pickup availability
‘भारत आणि पूर्वेकडील देशातील प्रवास’ (खंड १ – १६७२-१६७४) – बार्थलेमी अॅबे कॅरे,
मराठी अनुवाद-संपादन –
सदानंद कदम, दीपा माने-बोरकर,
बार्थलेमी अॅबे कॅरे(Barthélemy Abbé Carré)
शिवकाळात महाराष्ट्रभर फिरलेल्या बार्थलेमी अॅबे कॅरे या फ्रेंच प्रवाशाच्या ‘The travels of the Abbé Carré in India and the Near East’ या प्रवासवर्णनाच्या पहिल्या खंडाचा मराठी अनुवाद ‘भारत आणि पूर्वेकडील देशातील प्रवास’ (खंड १ – १६७२-१६७४)’ या नावानं नुकताच सदानंद कदम, दीपा माने-बोरकर यांनी केला आहे. अक्षर दालन, कोल्हापूर यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला लेखकद्वयांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...
मराठी मुलखात जन्मलेल्या प्रत्येकाच्याच श्वासासोबत असतात ते तीन शब्द- ‘छत्रपती शिवाजी महाराज’. वाढत्या वयात सह्माद्रीतील गडकोट आणि शिवचरित्रातील पराक्रमाच्या कथा आपल्या सगळ्यांच्याच नसानसांत भिनत जातात. ‘राजा शिवछत्रपती’ हाच आपला श्वास होतो. ज्या राजाची धवलकीर्ती जगभरातल्या अनेक देशातल्या अनेक भाषांत समकालात नोंदवून ठेवली गेली आहे, असा या भूमीतला हा एकमेव महापुरुष … एकमेवाद्वितीय!
यथावकाश आपल्या आयुष्यात ‘इतिहास’ येतो, पण आपण गुंतून जातो ते पराक्रमाच्या कथा ऐकण्यात आणि वाचण्यात. तिथंच आपण रेंगाळतो आणि मग या महापुरुषाचं चरित्र समजून घेण्यास एक प्रकारची मर्यादा पडते. आपण झापडबंद होतो आणि मग सुरू होतं ते अपुत्या अभ्यासावर आधारलेलं आपलं प्रतिपादन. आजकाल सर्वदूर दिसत असलेल्या वादांची मूळं दडली आहेत ती तिथंच. म्हणूनच भाषेची बंधनं न पाळता, उपलब्ध सर्व प्रकारच्या साधनांतून इतिहासातली व्यक्तिमत्त्वं समजून घ्यायला हवीत.
याचाच एक प्रयत्न म्हणजे बार्थलेमी अॅबे कॅरे याचं हे प्रवासवर्णन. फ्रेंच सरकारचा हा प्रतिनिधी. त्याचं नाव कानावर पडलं ते साधारण १९८५च्या सुमारास. शिवकाळात महाराष्ट्रभर फिरून गेलेला हा माणूस. हळूहळू त्यानं नोंदवलेली शिवाजी महाराजांविषयीची काही वाक्यंही कानावर पडू लागली. वाढत्या वयाबरोबर कॅरेविषयीची उत्सुकताही वाढीस लागली. त्यानं लिहिलेल्या फ्रेंच भाषेतल्या त्या प्रवास वर्णनाचे काही भाग हाती आले, अद्याप काही भाग यायचे आहेत, पण ते समजून घेण्यात मुख्य अडचण येत होती ती भाषेची. त्यामुळे हाती पडलेले काही भागही घरातल्या ग्रंथालयाची शोभा वाढवत राहिले.
यथावकाश त्याचा इंग्रजी अनुवादही वाचावयास मिळाला. साधारण १९९५च्या दरम्यान आमचे ज्येष्ठ मित्र इतिहास संशोधक ‘शिवभूषण’कार निनादराव गंगाधरराव बेडेकर यांच्यासोबत कॅरे आणि त्यानं केलेल्या नोंदीविषयी अनेकवार चर्चा करण्याचा योग आला. कॅरेचं हे लेखन मराठीत आणाच असा त्यांचा सततचा आग्रह!
दरम्यानच्या काळात एक फ्रेंच जाणकार भेटला. त्याच्यामुळे फ्रेंच शब्दांचे उच्चार आणि अर्थ समजून घेता आले. त्याच्या मदतीमुळे आणि इंग्रजी अनुवादाचा आधार घेत हे काम पूर्ण करता आलं. तो फ्रेंच भाषेचा अभ्यासक म्हणजे निरंजन प्रकाश माने. त्यांच्यामुळे या अनुवादाला गती आली आणि हे काम पूर्ण होऊ शकलं, म्हणून आम्ही त्याचे आभारी आहोत.
हे करत असतानाच डॉ. सुरेंद्रनाथ सेन आणि सर जदुनाथ सरकार यांनी इंग्रजीत आणलेला कॅरेही सोबतीस होताच. गेले वर्षभर आम्ही कॅरेमय झालो होतो. त्यांना समजून घेत होतो. त्यांच्या काळात साधारण सहा परकीय प्रवासी या देशात येऊन गेले होते. त्यापैकी अनेकांनी आपले अनुभव लिहूनही ठेवले आहेत. आपल्या मराठी मुलुखात येऊन गेलेल्या त्या लोकांनी शिवाजीराजांविषयी आपली मतं नोंदवून ठेवली आहेत. पण त्यात सर्वांत जास्त लिहिणारा माणूस आहे बार्थलेमी अॅबे कॅरे. शिवाजीराजांविषयीच्या त्याच्या नोंदी वाचताना महाराजांचं ध्येय, प्रशासन आणि कामाची पद्धत नव्यानं समजत होती. ती आपल्याही लक्षात यावी म्हणून हा अनुवाद.
या अनुवादामुळे आपल्याला शिवचरित्राकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळेल…कारण यांनी शिवरायांच्या काळात स्वराज्यात प्रवास केला.हुबेहूब वर्णन लिहून ठेवले.....अतिशय सुंदर आणि महत्वाचा ग्रंथ! मखमली कपड्याचे आवरण असलेला ग्रंथ प्रत्येक मराठी माणसाने, शिवभक्तांनी वाचावा असा आहे.
‘भारत आणि पूर्वेकडील देशातील प्रवास’ (खंड १ – १६७२-१६७४) –
बार्थलेमी अॅबे कॅरे,
मराठी अनुवाद-संपादन –
सदानंद कदम, दीपा माने-बोरकर
Share
