३१ ऑक्टोबर, १९८४....सकाळची वेळ. त्या आपल्या बगिच्यातून चालत निघाल्या होत्या. चेहऱ्या वर स्मितहास्य. दोन्ही हात जोडून नमस्कार करत. इंदिरा नेहरू गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली. त्यांनी आपलं जीवन जसं व्यतीत केलं, अगदी तसाच मृत्यू त्यांना प्राप्त झाला. माणसांच्या गर्दीत असूनही शेवटी एकाकीच! एका महानाट्याचा, एका आयुष्याचा हा असा महाभयंकर शेवट झाला. ज्या युगात भारतीय राष्ट्रवादाने जन्म घेतला त्याच युगात इंदिराजींचा जन्म झाला. त्यांचे पिता जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना `क्रांतीचे अपत्य` म्हणून संबोधले. -शरीर मनाने कणखर अशा इंदिराजींनी स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकारणात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची आहे, हे मुळी विधिलिखितच होतं. ही भूमिका अंगिकारताना सुरुवातीला त्या काहीशा कचरल्याही होत्या. एकेकाळी शरीरप्रकृतीने नाजूक व स्वभावाने लाजाळू व अंतर्मुख असलेल्या इंदिराजींनी एकदा राजकारणातील ही आपल्यावर पडलेली जबाबदारी स्वीकारली व त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. जगातील सर्वात सामथ्र्यशाली व महत्त्वपूर्ण नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या त्या पंतप्रधान बनल्या, परंतु येथील समाजात धर्माधर्मांमध्ये दुफळी माजलेली होती. या अवाढव्य देशातील समाजाची मानसिकता समजण्यास अत्यंत क्लिष्ट होती. येथे पुरुषांचे वर्चस्व होते. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नेतृत्व ज्या स्त्रीने समर्थपणे सांभाळले, विसाव्या शतकाच्या इतिहासात ज्या स्त्रीने आपली नाममुद्रा उमटवली व ज्या स्त्रीला `वूमन ऑफ द मिलेनियम` म्हणून गौरवण्यात आले अशा एका स्त्रीच्या जीवनाचा मागोवा कॅथरीन फ्रँक यांनी येथे घेतला आहे.