नामांकित लेखक श्री. अच्युत गोडबोले व सहलेखिका डॉ. वैदेही लिमये यांनी सखोल अभ्यास, ओघवती भाषा, विचारांची मुक्त पखरण विश्वखाणी शब्दांच्या मखरात बसवून रक्ताला वाहते ठेवले आहे कारण रक्तगंगा सतत वाहती राहिली पाहिजे, तरच जीवन सुंदर होईल, जीवन सुंदर असून ते अधिक सुंदर करण्यातच माणसाच्या जगण्याचे तथ्य आहे; कारण भवचक्र फिरत राहणार असून जीवनसंगीताने ते व्यापलेले आहे, म्हणून जीवन प्रवाही होण्यासाठी रक्त खेळते हवे. रक्ताचा सलोनी झेला या पुस्तकातून व्यक्त होतो.
वाचनीय, मननीय, चिंतनीय असे वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेले तरीही रंजक असलेले हे पुस्तक ज्ञान व विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांची उत्तम सांगड घालते. रक्ताचे आजार, त्यावरील उपचार पद्धती, रक्तदानाचे महत्त्व आणि रक्ताचा बाजार कसा थांबवता येईल, यावर मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आबालवृद्धांना उपयुक्त ठरेल ही माझी खात्री आहे. सर्वांचे रक्त स्वच्छ, हसरे, खेळते व प्रवाही राहो या सदिच्छा.
– डॉ. स्नेहलता देशमुख
सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ, शिक्षणतज्ञ आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू
सिद्धहस्त लेखक अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये या लेखकद्वयींनी अपार मेहनत घेऊन लिहिलेलं ‘रक्त’ हे पुस्तक वाचून खूप समाधान वाटलं. ‘रक्त’ या नावाभोवती जे गूढ वलय आहे, त्याचं रहस्य उलगडत जाणारं हे पुस्तक इतिहासाचा परामर्श घेता घेता मनोरंजक पद्धतीनं अनेक शास्त्रीय तपशील मांडतं.
रक्ताशी निगडित असलेल्या मानवाच्या प्राचीन काळापासूनच्या कल्पना व प्रथा, रक्ताच्या संशोधनातील बारकावे, रक्तदान, अत्याधुनिक उपचार पद्धती, रक्ताचं आर्थिक मूल्य, रक्तव्यवस्थेचं राजकारण आणि भ्रष्ट व्यवस्थेतून पसरलेले आजार अशा सर्व विषयांचा धांडोळा हे पुस्तक घेतं. सर्वसामान्य वाचक, विज्ञानप्रेमी अभ्यासूंप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांनादेखील हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही. सामान्य वाचकांशी रक्ताचे नाते जोडणाऱ्या या परिपूर्ण पुस्तकासाठी मनापासून अभिनंदन!
– डॉ. अजित भागवत
सुप्रसिद्ध हृदयविकारतज्ञ