साहित्याची भाषा ह्या डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या प्रस्तुत पुस्तकात वाङ्मयीन शैलीचा अभ्यास करणाऱ्यांची प्राथमिक गरज भागवू शकतील, असे काही लेख सोप्या भाषेत मांडलेले आहेत. साहित्याचा अभ्यास ऐतिहासिक, चरित्रात्मक, नैतिक, मानसशास्त्रीय इत्यादि अनेक अंगांनी होत असला तरी भाषेची नीट जाण असल्याशिवाय कुठलेही साहित्याचे आकलन पूर्ण होत नाही, कारण साहित्य हे फक्त भाषेतूनच व्यक्त होत असते. साहित्याचा कोणीही अभ्यासक साहित्याच्या भाषेला कमी अधिक प्रमाणात प्रतिसाद देत असतोच. तथापि भाषा ही केवळ पुस्तकातच आढळणारी वस्तु नसून ह्या लिखित भाषेच्या
पायाखाली विशाल जनसमूहांकडून बोलली जाणारी व्यवहारातील भाषा विविध स्वरूपात अस्तित्वात असते. हे भाषेचे खरे स्वरूप लक्षात घेतल्याशिवाय
साहित्यिक भाषेचे मर्म कळत नाही. भाषेची तत्त्वे, तिची जडणघडण आणि विविध रुपे यांचा शास्त्रीय अभ्यास साहित्यकृतीच्या वस्तुनिष्ठ अभ्यासाला अत्यंत उपकारक ठरतो. भाषेच्या अनेकविध रुपांच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या मांडणीला शैली असे म्हणतात. शैलीच्या अभ्यासकांना प्रस्तुत पुस्तक अत्यंत मोलाचे ठरेल.