केवळ स्वतःच्या आविष्कारसामर्थ्यावर सातशे वर्षे जिवंत राहिलेला चोखा हा एकमेव मराठी कवी ठरतो. चोखामेळा आणि त्याचे कुटुंबीय हे केवळ वारकरी विठ्ठलभक्त म्हणून किती महत्त्वाचे असतील ते असोत, मराठी वाङ्मयीन संस्कृतीची तिच्या उगमापासूनची एक मोठी मर्यादा स्पष्टपणे दाखवत राहाण्याचे ऐतिहासिक कार्य ह्या मंडळींनी निश्चित पार पाडले आहे. चोखामेळा हा मराठी समाजाच्या प्रारंभीच्या जातीजमातींच्या कडबोळ्यातला भक्कम एकजिनसीपणाचा आधार देणाऱ्या सुरवातीच्या काही थोर प्रतिभावंतापैकी एकप्रमुख नायक आहे. त्याच्याबद्दल त्याचा क्रांतिकारक गुरुमित्र नामदेव याच्यापासून तर महादेव गोविंद रानडे यांजपर्यंतच्या सर्वच प्रतिभवंतांनी मुक्तपणे प्रशंसोद्गार काढलेले आहेत. ज्याच्याबद्दल असे अत्यादराचे उद्गार सतत सातशे वर्षे निघत असूनही त्यांतली अपराधी भावना लपवता येत नाही, असा हा एकमेव मराठी धर्माचा संस्थापक आहे. अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे साने गुरुजींनी उपोषण करेपर्यंत चोखामेळा अत्यंत शांत चित्ताने मराठी समाजाच्या सात शतकांच्या कोतेपणाची सरळ उभी रेषा दाखवीत एकटा उभा आहे. वास्तुस्मारक आणि दस्तऐवज ह्या दोन्ही पुराव्यांनी चोखामेळा आपल्या संस्कृतीच्या पायातच वाढत गेलेला तडा नेहमीच दाखवत राहील. त्यामुळे चोखामेळ्याचा अभ्यास मराठीत नेहमीच एक धडा म्हणून महत्त्वाचा राहील.