जेव्हा हुमॅटॉइड आथ्र्रायटिसचंं निदान झालं, तेव्हा ती सर्वांत वाईट गोष्ट होती, असं वाटलं होतं. कशाला मी टेनिस खेळले? ते कधीच खेळले नसते, तर जास्त बरं झालं असतं, असं मला वाटत होतं. एकतर आजारपणाचं दु:ख आणि टेनिस खेळण्यात इतकं प्रावीण्य असून तो खेळता येत नाही, याचं आणखी दु:ख! म्हणजे प्रचंड दु:ख! माझ्या स्मृतींच्या कोशातून मला टेनिसचे दिवस पुसून काढायचे होते. जणू ते दिवस कधी अस्तित्वातच नव्हते, असं स्वत:ला भासवायचं होतं; पण आता लिहिताना स्पर्धेच्या आठवणी जाग्या झाल्या. स्पर्धेतला थरार, चुरस, गंमत, टेनिस कोर्टावरचे आनंदाचे क्षण तर मला आठवलेच; पण मी किती जिद्दीने खेळत होते, जिंकण्याच्या ईष्र्येने खेळत होते तेही आठवलं. मला जिंकायचंच आहे, दुस-या क्रमांकावर यायचं नाही, पहिलाच क्रमांक पाहिजे हेच ध्येय असायचं. हे आठवलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं, टेनिस खेळण्याचा माझा अनुभव अतिशय अनमोल होता. टेनिस कोर्टवर जी जिद्द, उत्साह, धडाडी मी दाखवत होते; तीच आता या आजाराशी लढताना उपयोगी पडत होती. मी आजाराला कधीच शरण गेले नाही, कारण टेनिसच्या प्रशिक्षणाने माझ्यात लढण्याचा आवेश आला होता. त्यामुळेच कदाचित मी स्वत:चा बचाव करू शकले.