तसलिमा नासरिन या बांगलादेशीय लेखिकेनं शब्दांत बांधलेलं हे तिचं लहानपण आहे. बांगलादेशात मुक्तिवाहिनीनं स्वातंत्र्यासाठी जो निर्वाणीचा लढा दिला, त्यावेळी तसलिमाचं वय होतं फक्त नऊ वर्षांचं; पण त्याही वेळी ती आताएवढीच चिंतनशील आणि संवेदनशील होती. तिची दृष्टी अतिशय तीक्ष्ण आणि शोधक होती. तिची स्मरणशक्ती तल्लख होती. स्वतंत्र प्रज्ञा असलेल्या बुद्धिवादी वडिलांचं स्खलन, ममताळू आणि धार्मिक आईचं धर्माच्या सोपानावरून हळूहळू अंधाNया खाईत उतरणं, दादाचं प्रेम, प्रौढ नातेवाइकाकडून तिचा झालेला लैंगिक छळ व त्यामुळं वाटणारी लाज आणि अपमान, धर्म आणि शास्त्र यांच्या नावांवर पीर अमीरुल्लाहांनी चालवलेला अत्याचार याचं तिनं धीट आणि थेट चित्रण या आत्मपर आणि कथात्म लेखनात केलं आहे. या अतिशय संवेदनशील आणि बंडखोर लेखिकेची आम्ही आतापर्यंत लज्जा (कादंबरी), फेरा (कादंबरी), निर्बाचित कलाम (लेखसंग्रह), निर्बाचित कविता (काव्य), नष्ट मेयेर नष्ट गद्य (लेखसंग्रह) अशी वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील पाच पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत. यांतून तिचं समग्र व्यक्तिमत्त्व प्रक्षेपित झालं आहे. या नव्या पुस्तकातील तिनं निवेदन केलेली एकही घटना खोटी नाही. कुठलंही पात्र काल्पनिक नाही. असं प्रामाणिक, स्पष्ट आत्मवृत्त बंगालीत अजून कोणी लिहिलेलं नाही. धारदारतेजस्वी भाषा, जिवंत व्यक्तिचित्रण आणि लेखणीच्या जादूच्या स्पर्शानं गद्याला आलेलं काव्याचं सौंदर्य ह्यांमुळं ह्या आत्मचरित्राचं वाचन हा वाचकाच्या दृष्टीनं एक आश्चर्यकारक अनुभव ठरणार आहे.