शाळेची सुरुवात परिपाठाने होते. परिपाठातून मुलांना दर्जेदार ज्ञान मिळावं.
हे ज्ञान केवळ पुस्तकी ज्ञानाशी निगडित न राहता ते विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निगडित असावं.
त्यातून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक शिक्षण, देशाचा जाज्वल्य इतिहास, आपली श्रेष्ठ संस्कृती, उत्तम आरोग्य, निसर्गाविषयी जिव्हाळा, पर्यावरणाविषयी आवड, सामाजिक समस्यांची जाणीव, स्वच्छता, पाण्याचे महत्त्व, मूल्यशिक्षण आदी बाबी रुजाव्यात, त्याप्रति जाणीव, जागृतीची भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी ही सर्वसाधारण अपेक्षा असते.
त्याकरिता परिपाठ हा पूर्ण क्षमतेने विद्यार्थ्यांसमोर आला पाहिजे.
परिपाठामध्ये दिवसभरासाठीच्या ज्ञानाच्या ऊर्जेचे सार असायला हवे.
परिपाठातूनच विद्यार्थ्यांना जीवन जगण्याचं, अध्यात्माचं, नैतिकतेचं, सामाजिक जाणिवेचं, ध्येयाप्रति वाटचाल करण्याचं बाळकडू मिळत असतं.
त्यासाठी या सर्व विषयांचा समावेश असलेल्या परिपाठाची- जो दर्जेदार, प्रेरणादायी असेल, विद्यार्थ्यांमधील ज्ञानाच्या उत्सुकतेची भूक शमवणारा असेल, निर्मिती करण्यात आली आहे. या परिपाठ पुस्तिकेमध्ये सबंध वर्षभराचे, म्हणजे शाळा सुरू होण्याच्या दिवसापासून, १५ जूनपासून ते शैक्षणिक वर्षअखेर म्हणजेच १५ मार्चपर्यंत असे वर्षभरातील २९० दिवसांच्या परिपाठाचे नियोजन करण्यात आले आहे. ही परिपाठ पुस्तिका विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा, शैक्षणिक संस्था यांना निश्चितच उपयुक्त राहील, यामध्ये दुमत नाही. आदर्श परिपाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जगण्याची एक वेगळी दिशा मिळेल अशी आशा आहे.
डॉ. पुरुषोत्तम भापकर हे औरंगाबादचे विद्यमान विभागीय आयुक्त असून यापूर्वी ते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी या पदांवर कार्यरत होते.
त्याचबरोबर त्यांनी महानगरपालिका, नगरविकास प्रशासन, अन्न व औषध प्रशासन, शिक्षण या विभागांत आयुक्त म्हणून;
तसेच रोहयो व जलसंधारण विभागात सचिव म्हणून काम पाहिले आहे.
अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या पुरुषोत्तम भापकर यांनी एल.एल.बी. या पदवीबरोबरच कृषी अर्थशास्त्रात पीएच.डी.ही मिळवली आहे.
त्यांच्या बहुविध कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार;
तसेच राष्ट्रपती पदकासह इतर अनेक पुरस्कारांनी वेळोवेळी गौरविण्यात आले आहे.