‘निवडणूकविषयक कायदे’ हे श्री. दिलीप शिंदे यांचे पुस्तक प्रकाशित होत असल्याचे कळाले. संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेल्या भारतासारख्या खंडप्राय देशात लोकांच्या मताचे, त्यांच्या इच्छा-आकांक्षांची पूर्तता करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे सरकार ज्या माध्यमातून निवडून येते त्या निवडणूक आयोगाचे स्वरूप आणि अधिकार जनतेला समजणे आवश्यक असते. तसेच ज्या कायद्यांच्या, नियमांच्या आणि संहितेच्या चौकटीत ही निःपक्षपाती आणि सर्वार्थाने सक्षम यंत्रणा काम करते, त्याचीही माहिती नागरिकांना असणे अपेक्षित असते, ती या पुस्तकातून मिळू शकेल. निवडणुकीस उभे राहण्यासाठी लागणारी पात्रता, विद्रूपीकरण बंदीसारखे परिणामकारक कायदे, आदर्श आचारसंहितेतील तरतुदी, निवडणूकविषयक गुन्हे, गुन्हेगारांचा राजकारणात प्रवेश होऊ नये म्हणून केलेल्या कायदेशीर तरतुदी आणि प्रत्यक्ष मतदानप्रक्रिया यांची सोप्या मराठी भाषेत अभ्यासपूर्ण मांडणी करून श्री. दिलीप शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक तयार केले त्याबद्दल त्याचे अभिनंदन! हे पुस्तक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनाही उपयुक्त ठरेल यात शंका नाही. मराठीत केला गेलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न असावा. पुस्तकास माझ्या शुभेच्छा!
(अरुण बोंगिरवार)
मुख्य सचिव महाराष्ट्र शासन.