Your cart is empty now.
फुलांनी बहरलेली नाजूक डहाळी वा-याच्या झुळकीने चांदण्यात थरथरावी, तसेच काहीसे श्री. हिमांशु कुलकर्णी यांची कविता वाचताना मला सतत जाणवत राहिले. अतिशय संवेदनशील मनाचा तो उत्कृष्ट आणि कोमल आविष्कार आहे. स्वत:कडे लक्ष आकर्षून घेण्यासाठी या कवितेला कसलीही नवी टूम लपेटून घेण्याची जरुरी वाटत नाही. आवाज मोठा करून ती कानावर आदळण्याचा सोस बाळगीत नाही. तिला स्वत:चीच सोबत पुरते. ती आयुष्याकडे उघड्या डोळ्यांनी पहाते. भोवतीच्या वास्तवाचे प्रखर भान तिला आहे. पण असे असूनही तिचा प्रकृतिधर्मच असा आहे की, स्वत:शीच हळुवारपणे गुणगुणल्यासारखी ती व्यक्त होते. हा प्रकृतिधर्म म्हणजे तिचे खानदान आहे. या प्रकृतिधर्माशी सुसंगत अशी सूचकता श्री. हिमांशु कुलकर्णी यांच्या कवितेत अगदी स्वाभाविकपणे आली आहे. मंगेश पाडगावकर
Added to cart successfully!