"तुमच्या लक्षात आलंय, कांद्याला कसे खूप पदर असतात ते? आणि कांदा चिरत असताना तुमच्या आईच्या डोळ्यांतलं पाणी तुम्ही बघितलंय? कांद्याला इतके पदर का असतात आणि तो चिरताना आपल्या डोळ्यांत पाणी का येतं, याचा उलगडा करणारी कथा उल्लेखनीय आहे. आंब्याची मधुर चव आपल्याला सर्वांनाच आवडते. उन्हाळ्यातील तप्त दिवशी आंबा आपली तहान आणि भूक भागवतो; पण आंब्याला त्याची ही मंत्रमुग्ध करणारी चव कुठून प्राप्त झाली असेल, असं कोडं तुम्हाला कधी पडलंय का? आंब्यात ही गोडी कशी आली याची कहाणी मोठी रोमांचकारी आहे. पृथ्वीचं जगावेगळं सौंदर्य, सुंदर सुंदर हिमाच्छादित अशी शिखरं आणि खोल समुद्र, रंगीबेरंगी फुलं आणि नानाविध प्रकारचे प्राणी हे सगळं पाहून तुमचं मन कधीतरी पृथ्वीवरच्या या सौंदर्यामुळे थक्क झालं असेल ना? पृथ्वीवरचं हे निसर्गसौंदर्य कुठून आलं, याची कहाणी खरोखर मनोवेधक आहे. खूप खूप वर्षांपूर्वी समुद्राचं पाणी गोड होतं आणि ते पिण्यायोग्य होतं. ते खारट कसं बनलं याची एक थक्क करणारी कथा आहे. भारताच्या लोकप्रिय लेखिकेने आपल्या अनन्यसाधारण, खेळकर आणि सरळ, साध्या शैलीत या कालातीत कथा आपल्यासाठी आणलेल्या आहेत. सुंदर सुंदर चित्रांनी नटलेली ही कथापुस्तिका बालवाचकांना सुधा मूर्ती यांच्या कथाविश्वाची ओळख करून देण्यासाठी अगदी योग्य आहे. "