भुलभुलैय्या` हा वपु काळे यांच्या चमत्कृतिप्रधान कथांचाफॅण्टसीजचासंग्रह. गेल्या वीस वर्षांत वपुंनी लिहिलेल्या फॅण्टसीजपैकीनिवडक अशा फॅण्टसीजचा समावेश या संग्रहात करण्यात आला आहे. सद्य:कालीन मध्यमवर्गीय माणसाला आहे त्या परिस्थितीतही जीवनाचा उत्कट आनंद कसा लुटता येईल हा जणू संदेश देण्यासाठी वपु काळे यांच्या चमत्कृतिपूर्ण कथांचा अवतार आहे. मात्र हा संदेश देण्यासाठी वपुंनी या कथा लिहिलेल्या आहेत याची बोचरी जाणीव वाचकाला कुठेही होत नाही, याचे श्रेय या कथांना दिलेल्या `फॅण्टसी`च्या अवगुंठनात आहे. वपु काळे यांच्या मिश्कील, खोडकर निवेदनशैलीमुळे वाचक या कथांकडे खेचला जातो. मानवी चांगुलपणावर वपुंची श्रद्धा आहे. जीवनातील विरोधाभासाने ते भयचकित होतात, पण परमेश्वराच्या योजनेत काहीतरी हितकारक सूत्र आहे याचीही त्यांना खात्री वाटते. त्यामुळे या साया व्यवहारांचे उदात्तीकरण करणे त्यांना विलोभनीय वाटते. त्यामुळे वाचकाची जीवनावरची श्रद्धा काळातनकळत दृढ होते. जीवनावर त्याचे प्रेम बसते, त्याला जगावेसे वाटते. लेखक कलावंताला यापेक्षा दुसरे काय हवे असते? शंकर सारडा