सत्याग्रही समाजवाद : गांधीवाद व मार्क्सवादाचा समन्वय by S.D. Pawar
सत्याग्रही समाजवाद : गांधीवाद व मार्क्सवादाचा समन्वय by S.D. Pawar
प्राचीन राज्ययंत्रणेमध्ये ‘राजा’ किंवा ‘शासक’ हा धर्माने प्रतिपादित केलेल्या न्याय कल्पनेप्रमाणे शासन चालवित असे. त्याला वेदान्ताची आध्यात्मिक बैठक असली, तरी हिंसा वर्ज्य नव्हती. आधुनिक काळात मार्क्सने भांडवलशाही, सरंजामदारी यांचा विरोध करून, श्रमजीवी कामगार-शेतकर्यांचे राज्य आणण्याची क्रांतिकारी संकल्पना ‘विरोधी विकासवादी तत्त्वज्ञाना’द्वारे मांडली; परंतु, त्यामध्येही सत्य व अहिंसा, साध्य-साधन विवेक ही तत्त्वे अग्रस्थानी नव्हती. विसाव्या शतकात युरोपात व्यक्तिवाद, राष्ट्रवाद व समाजवाद या विचारसरणी विकसित झाल्या पण त्यातूनही जनसामान्यांचे सर्व प्रश्न सुटू शकले नाहीत.
या पार्श्वभूमीवर आचार्य जावडेकरांनी प्रतिपादन केलेले सत्याग्रही समाजवादाचे नवे तत्त्वज्ञान हे व्यक्तीच्या आत्मबलाला आवाहन करीत असतानाच, राज्यकर्त्यांच्या अन्यायाविरुद्ध सत्याचा आग्रह अहिंसक मार्गांनी (असहकार, सविनय कायदेभंग, इ. अभिनव पद्धतींनी) प्रकट करते. हे तत्त्वज्ञान ‘जेलों के बिना जब दुनिया की सरकार चलायी जाएगी, वह सुबह कभी तो आएगी’ अशा एका आदर्श राज्य व समाज व्यवस्थेकडे नेणारे असून, त्यात एकीकडे वेदान्ताला नवा अर्थ व आशय देण्याची क्षमता आहे तर दुसरीकडे पाश्चात्त्य समाजवाद, मार्क्सप्रणीत साम्यवाद यातील उपयुक्त तत्त्वांचा सुंदर समन्वय महात्मा गांधींनी केलेला आहे, असे आचार्य जावडेकरांना वाटते.
थोर राजकीय विचारवंत आचार्य जावडेकर (१८९४-१९५५) यांनी वेदान्तापासून मार्क्सवाद, समाजवाद, सत्याग्रहाचे क्रांतिशास्त्र या सार्यांचा सखोल अभ्यास करून, गांधीवादाची विस्तृत मीमांसा केली. हे त्यांचे कार्य राज्यशास्त्राच्या विकासात भर घालणारे तर आहेच पण सत्याग्रही समाजवाद हा साम्यवाद व गांधीवाद यांचा परिणत समन्वयच आहे.